गोंदिया,
mongoose-seized गोंदिया वनपरिक्षेत्रांतर्गत कामठा-नवरगाव नदी पुलाजवळ वन्यजीवांच्या शिकारीचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वनविभागाच्या गस्ती पथकाने कारवाई करीत सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वन्यप्राणी उदमांजराची तीन मृत पिल्ले आणि मुंगसाचे केस जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील वन्यजीवांच्या अवैध शिकारीचा प्रकार समोर आला आहे.
अजित कुमार धामी, करण सिंह करोडी, श्यानंदन रुदल धाम, आमला धाम करोती, कटंनी रामदेव मोहतू, मुकेश धनू महतो, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. सर्व सहाही आरोपी बिहार येथील विविध ठिकाणातील रहिवासी असून सद्या गोंदिया तालुक्यातील खातिया येथे वास्तव्यास होते. मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास गोंदिया वनपरिक्षेत्रातील गोंदिया सहवनक्षेत्रांतर्गत कामठा येथे क्षेत्र सहायक एम. डब्ल्यू. भांडारकर व वनरक्षकांचे पथक नियमित गस्तीवर असताना कामठा-नवरगाव नदी पुलाजवळ तीन व्यक्ती हातात लाकडी काठ्या घेऊन संशयास्पद स्थितीत आढळले. यावेळी त्यांच्या काठ्यांच्या टोकाला लोखंडी टोकदार शस्त्रे असल्याचे निदर्शनास आले.
वनाधिकार्यांनी तातडीने त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळील पिशवीत उदमांजराची तीन पिल्ले मृतावस्थेत आढळून आली. या घटनेची गंभीर दखल घेत वनविभागाने परिसरात तपासणी मोहीम राबविली. यावेळी अन्य तीन व्यक्तींकडून मुंगसाचे केस मिळून आले. या प्रकरणी एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, वनविभागाकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी कुडवा येथील डॉ. एस. एच. शेंद्रे व त्यांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात उदमांजराच्या तिन्ही मृत पिल्लांचे शवविच्छेदन करण्यात आले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात वन्यजीवांच्या शिकारीमागील नेमके कारण, जप्त साहित्याचा वापर आणि अन्य संभाव्य सहभाग याबाबत वनविभागाकडून तपास केला जात आहे.
एक दिवसाची वनकोठडी
अटक करण्यात आलेल्या सर्व सहाही आरोपींना आज, न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची वनकोठडी ठोठावली आहे.