महिला पोलीस उपनिरीक्षकाचा बाथरूममध्ये आढळला मृतदेह

    दिनांक :17-Nov-2026
Total Views |
उत्तर प्रदेश
Greater Noida
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानातील बाथरूममध्ये आढळून आल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. रश्मी गौतम असे मृत महिला अधिकाऱ्याचे नाव असून, मंगळवारी ही घटना उघडकीस आली. जारचा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांची नियुक्ती होती. प्राथमिक अंदाजानुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी रश्मी गौतम यांचे वडील त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी अनेकदा फोन केला; मात्र रश्मी यांनी फोन उचलला नाही. बराच वेळ प्रयत्न करूनही संपर्क होत नसल्याने त्यांच्या वडिलांनी रश्मी यांच्यासोबत राहणाऱ्या अन्य एका महिला पोलीस उपनिरीक्षकाशी संपर्क साधला. त्यांनी रश्मी यांच्याशी बोलून देण्याची विनंती केली. त्यानुसार संबंधित महिला अधिकारी रश्मी यांच्या खोलीजवळ पोहोचल्या. मात्र, बराच वेळ दरवाजा ठोठावूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

परिस्थिती संशयास्पद वाटल्याने या घटनेची माहिती तातडीने पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडला. आत जाऊन पाहणी केली असता रश्मी गौतम या बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळून आल्या. हा प्रकार समोर येताच उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे. रश्मी गौतम या २०२३ च्या बॅचमधील पोलीस उपनिरीक्षक होत्या. वर्ष २०२४ पासून त्या ग्रेटर नोएड्यातील जारचा पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. त्या मूळच्या कानपूर नगर येथील रहिवासी होत्या. विशेष म्हणजे, त्यांचे वडीलही उत्तर प्रदेश पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.

प्राथमिक स्तरावर हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी या निष्कर्षाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अहवालातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कायदेशीर आणि तपासविषयक कार्यवाही केली जाणार आहे.

दरम्यान, रश्मी गौतम यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका तरुण महिला पोलीस अधिकाऱ्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने पोलीस दलातही शोक व्यक्त केला जात आहे.