नवी दिल्ली,
india-and-pakistan-to-clash-again क्रिकेट चाहत्यांसाठी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्याची संधी चालून आली आहे. आशिया कप रायझिंग स्टार २०२६ या स्पर्धेत दोन्ही देशांचे संघ आमनेसामने येणार असून, २२ नोव्हेंबर रोजी दोघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. अलीकडेच भारताने पाकिस्तानचा पराभव करून १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ चे विजेतेपद मिळवले होते. आता पुन्हा एकदा या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
आशियाई क्रिकेट परिषदेकडून आयोजित करण्यात येणाऱ्या रायझिंग स्टार स्पर्धेचा पहिला सामना १९ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यात सामना होईल. त्यानंतर श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे संघ मैदानात उतरतील. या स्पर्धेत काही देशांचे मुख्य संघ, तर काही देशांचे 'अ' संघ सहभागी होत आहेत. भारत आणि पाकिस्ताननेही आपल्या 'अ' संघांना स्पर्धेसाठी पाठवले आहे.
भारतीय 'अ' संघ २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध पहिला सामना खेळून स्पर्धेतील मोहिमेला सुरुवात करेल. याच दिवशी पाकिस्तानचा संघ संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध खेळणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व तिलक वर्मा याच्याकडे सोपवण्यात आले असून, रिंकू सिंग उपकर्णधारपद सांभाळणार आहे. भारतीय खेळाडू दोहा येथे दाखल झाले असून, त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे.
या स्पर्धेतील सर्वाधिक चर्चेचा सामना २२ नोव्हेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. नेपाळविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानशी दोन हात करेल. दोहा येथे होणाऱ्या या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरुवात होईल. अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांच्या कामगिरीकडेही चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे.
या स्पर्धेसाठी भारताच्या 'अ' संघात कर्णधार तिलक वर्मा आणि उपकर्णधार रिंकू सिंग यांच्यासह अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग, कुमार कुशाग्र, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विपराज निगम, हर्ष दुबे, तनुष कोटियन, अरविंद खान, प्रिन्स अरविंद आणि अरविंद सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे.