तिर्री गावात अखेर बिबट जेरबंद!

चिमुकल्याच्या जीव गेलेल्या ठिकाणा पासून 350 मीटरवर पिंजऱ्यात अडकला!

    दिनांक :17-Nov-2026
Total Views |
भंडारा,
leopard-finally-trapped-in-tirri-village स्वयंपाक घरात शिरूर सहा महिन्याच्या बालकाला उचलून नेत बिबट्याने ठार केल्याच्या घटनेनंतर पवनी तालुक्यातील तिर्री गाव आणि परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण होते. 14 रोजी घडलेल्या या घटनेनंतर वनविभाग पूर्ण शक्तीनिशी बिबट्याला जेरबंद करण्याच्या कामाला लागले. याच परिसरात 16 नोव्हेंबर च्या रात्री एक बिबट वनविभागाच्या पिंजऱ्यात बंद झाला आहे. नर असलेला हा बिबट चिमुकल्याचा जीव घेणारा आहे का? याची खात्री मात्र काही तपासण्या नंतर होऊ शकेल, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे. असे असले तरी बिबट नागरिकांनी मात्र काहीसा सुटकेचा श्वास सोडला असावा.
 
 
leopard-finally-trapped-in-tirri-village
 
अड्याळ वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जंगल व्याप्त तिर्री
या गावातील अभिमान बोन्द्रे यांच्या घरात शिरून 14 नोव्हेंबरच्या रात्री एका बिबट्याने घरातील सदस्यांच्या डोळ्यादेखत स्वयंपाक घरातून अद्वैत या सहा महिन्याच्या बाळाला पळविले होते. यात अद्वैतचा जीव गेला होता. त्यानंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. वनविभागाने त्यावेळी परिस्थिती नीट हाताळून पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
 
 
घटना घडली तेव्हापासूनच वनविभागाच्या वेगवेगळ्या पथकांकडून बिबट्याचा शोध घेणे सुरू झाले. जवळपास 12 ते 13 ठिकाणी पिंजरे बसविण्यात आले. लाईव्ह कॅमेरे ड्रोन च्या माध्यमातून शोध घेतला गेला. पवनी, भंडारा, नवेगाव नागझिरा येथील विशेष बचाव पथकाच्या माध्यमातून मागील तीन दिवसांपासून शोध मोहीम राबवली जात होती. मागील तीन दिवसांपासून वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी बिबट जेरबंद व्हावा यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. अखेर आज पहाटे एक पथक गस्तावर असताना त्यांना एका पिंजऱ्यात बिबट अडकल्याचे दिसले. ज्या ठिकाणी बाळाला ठार केले त्यापासून अवघ्या 350 ते 400 मीटरवर असलेल्या पिंजऱ्यात बिबट अडकल्याने हा तोच बिबट असा अंदाज बांधला जातं आहे, मात्र त्याची खात्री झालेली नाही. नर असलेला हा बिबट 18 ते 20 महिन्याचा असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. ताब्यात आलेल्या बिबट्याला नागपूर येथील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात आले आहे.
 
 
बिबट जेरबंद झाल्याने तिर्री गावातील नागरिकांनी काहीसा दिलासा मिळाला असला तरी भीतीच वलय अजून कायम आहे. पण घटनेनंतर असलेला आक्रोश बऱ्याच अंशी कमी झाला आहे.
 
वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, सोबतच ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे बिबट पकडण्यात यश आले. आता हा तोच बिबट आहे का? याची खात्री काही तपासण्या झाल्यानंतरच होईल. या अभियानामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी जीव ओतून योगदान दिले. ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या सामूहिक प्रयत्नातून हे शक्य झाले. असे सांगत, गावकऱ्यांना वन्य धोका होऊ नये म्हणून काळजी घेण्याच्या दृष्टीने आमचे सर्व प्रयत्न अजूनही सुरू असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांनी तभाशी बोलताना सांगितले.