मुंबई
New Lift Safety Rules लिफ्ट, एस्कलेटर आणि मूव्हिंग वॉकवेच्या वापरादरम्यान होणारे अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरक्षा नियम अधिक कठोर केले आहेत. १ नोव्हेंबर २०२६ पासून राज्यात नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार, १२ वर्षांखालील मुलांना प्रौढ व्यक्तीच्या सोबतीशिवाय लिफ्ट, एस्कलेटर किंवा मूव्हिंग वॉकवेचा वापर करता येणार नाही.
मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
महाराष्ट्र लिफ्ट्स, एस्कलेटर आणि मूव्हिंग वॉकवेज नियम, २०२६ मधील नियम १०(१३) नुसार, १२ वर्षांखालील मुलांसोबत प्रौढ व्यक्ती असणे अनिवार्य करण्यात आले आहे. निवासी इमारती, शॉपिंग मॉल्स तसेच या नियमांच्या कार्यकक्षेत येणाऱ्या अन्य आस्थापनांनाही ही तरतूद लागू राहणार आहे. मात्र, १२ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांना या विशिष्ट निर्बंधातून वगळण्यात आले आहे.
नवीन नियमांनुसार, नव्याने बसविण्यात येणाऱ्या लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर जुन्या लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, ऑटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाइस आणि ओव्हरलोड प्रोटेक्शन डिव्हाइस नसल्यास ती उपकरणे बसवावी लागणार आहेत. यासाठी २८ ऑक्टोबरपासून एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे.लिफ्ट, एस्कलेटर किंवा मूव्हिंग वॉकवे वापरताना अपघात घडल्यास त्याची माहिती २४ तासांच्या आत विद्युत निरीक्षक आणि स्थानिक पोलिसांना कळवावी लागणार आहे. तसेच, लिफ्ट ऑपरेटरसाठी किमान १८ वर्षे वयाची अट निश्चित करण्यात आली आहे.नवीन नियमांमुळे सुरक्षा मानकांचे पालन न करणाऱ्या यंत्रणांविरोधात प्रशासनाला कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. एखादी लिफ्ट किंवा अन्य यंत्रणा असुरक्षित असल्याचे निदर्शनास आल्यास तिचा वापर बंद करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देता येतील.
महाराष्ट्र लिफ्ट्स, एस्कलेटर आणि मूव्हिंग वॉकवेज अधिनियम, २०१७ अंतर्गत हे नियम तयार करण्यात आले आहेत. परवाना वितरण आणि तपासणीची प्रक्रिया अधिक विकेंद्रित करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने २०२६ मध्ये या कायद्यात सुधारणा केली होती.