अनिल कांबळे
नागपूर
Nagpur Extra Marital Affair उच्चशिक्षित पती आणि पत्नी यांचे एकमेकांवर अगाढ प्रेम. त्यांच्या संसारवेलीवरील दोन मुलांसह सुखी संसार सुरु होता. मात्र, अचानक पतीच्या आयुष्यात नव्याने प्रेम फुलले. दोघांचे प्रेमसंबंध वाढले आणि गुण्यागोविंदाने सुरु असलेल्या संसाराला गालबोट लागले. प्रेयसीच्या ‘एंट्री’मुळे दोन्ही कुटुंबात वाद होऊन दोघांचाही संसार विस्कटला. मात्र, पोलिसांच्या समूपदेशनाने दोन्ही कुटुंबांनी सामंजस्य दाखवल्यामुळे दोघांचेही संसार पुन्हा फुलले.

अजय आणि दिपाली (काल्पनिक नावे) हे दोघेही उच्चशिक्षित. अजय एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या विभागीय प्रमुख पदावर काम करतो तर दिपाली ही एमबीए असून एका कंपनीत एच आर मॅनेजर आहे. एकमेकांचे नातेवाईक असलेले अजय आणि दिपाली यांचा कुटुंबियांनी संमतीने विवाह लावून दिला. सुखी संसार सुरु असतानाच दोघांच्या जीवनात एक मुलगा आणि एक मुलगी झाली. ‘हॅपी फॅमिली’ म्हणून या दोघांच्या कुुटुंबियांना ओळखल्या जायला लागले. दोन्ही मुले आजी-आजोबांकडे राहत होती. दोघेही कौटुंबिक जबाबदाऱ्यांसह कार्यालयातील कामे नीटनेटकी करीत होती. अजयला समाजकार्याची आवड असल्यामुळे तो काही वेळ या कार्याला द्यायला लागला. सार्वजनिक सण-उत्सवात सक्रिय सहभाग घेत असल्यामुळे त्याची ओळख वाढली. काही दिवसांनंतर मात्र, त्यांच्या या सुखी संसाराला कुणाचीतरी दृष्ट लागली.
अचानक प्रेयसीची ‘एंट्री’
अजयचा स्वभाव बघून त्यांच्याच सोसायटीत राहणारी रिया (काल्पनिक नाव) ही विवाहित तरुणी विजयच्या संपर्कात आली. तिने अजयचा मोबाईल नंबर मिळवला आणि मैत्री केली. हळूहळू दोघांची मैत्री वाढली. विवाहित असल्याचे विसरुन दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. अजयचा घरातील स्वभाव बदलला. तो बराच वेळ रियाला द्यायला लागला. दिपाली आणि मुलांकडे दुर्लक्ष करुन रियासोबत बाहेर फिरायला लागला.
विस्कटला दोघांचाही संसार
अजय आणि रियाच्या अनैतिक संबंधाची माहिती दिपालीला मिळाली. दरम्यान, रियाच्या पतीलाही विजयसोबतचे काही फोटो मिळून आले. मात्र, रिया आणि अजय दोघेही प्रेमसंबंध असल्याचे मान्य करीत नव्हते. त्यांच्या दोघांच्या संबंधामुळे अजय आणि रिया या दोघांच्याही घरात वाद व्हायला लागले. रिया आपल्या दोन्ही मुलांना सोडून माहेरी निघून गेली. अजयची पत्नीसुद्धा वेगळी राहायला लागली. अशाप्रकारे दोघांचेही संसार विस्कटले.
वाद पोहचला पोलिस ठाण्यात
जवळपास दोन वर्षे कौटुंबिक वादामुळे त्रस्त असलेल्या अजय आणि रियाच्या पतीचा वाद झाला. दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. तो वाद पोलिस ठाण्यात पोहचला. एका पोलिस अधिकाऱ्याने प्रकरण समजून घेत दोघांच्या कुटुंबियांना पोलिस ठाण्यात बोलावले. रिया आणि दिपालीचे समूपदेशन केले. अजयने पत्नीची माफी मागितली. रियाच्या पतीनेही मनाचा मोठेपणा दाखवला. अशाप्रकारे पोलिसांच्या समूपदेशनाने दोन्ही संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचले.