नागपूर
Abortion Pills डॉक्टरांचा सल्ला आणि वैद्यकीय तपासणी न करता गर्भपाताची औषधे घेणे महिलांच्या जीवावर बेतू शकते, याची गंभीर बाब नागपुरात समोर आली आहे. गेल्या दीड वर्षात गर्भपाताची औषधे घेतल्यानंतर चार महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मृत महिलांपैकी तिघी नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील, तर एक महिला शहरातील रहिवासी होती. विशेष म्हणजे, या चारही महिलांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यातच शहरात विनापरवाना गर्भपाताच्या औषधांचा साठा आणि विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस आल्याने महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ग्रामीण भागातील तीन महिलांचा समावेश
गेल्या दीड वर्षातील चार घटनांमध्ये गर्भपाताची औषधे घेतल्यानंतर महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये रामटेक, कळमेश्वर आणि सावनेर या नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील प्रत्येकी एका महिलेचा समावेश आहे. तर चौथी महिला नागपूर शहरातील होती.
औषधोपचारानंतर या महिलांचा मृत्यू झाला असला, तरी औषधांमुळेच मृत्यू झाला, असा निष्कर्ष अद्याप काढण्यात आलेला नाही. मृत्यूमागील नेमकी वैद्यकीय कारणे स्पष्ट होण्यासाठी स्वतंत्र तपासणी आवश्यक आहे.गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करता येत नाही. मात्र, प्रत्यक्षात काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून या औषधांचा साठा आणि विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
ऑगस्ट २०२६ मध्ये अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि नागपूर पोलिसांनी विनोबा भावे नगर परिसरातील एका दवाखान्यावर संयुक्त कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान एका डॉक्टरसह दोघांना ताब्यात घेण्यात आले. तपासणीमध्ये ७० एमटीपी किट आढळून आले. याशिवाय एकूण ४५ हजार ६४९ रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला.स्त्रीरोग आणि प्रसूतितज्ज्ञांच्या मते, गर्भपातासाठी औषधोपचार करण्यापूर्वी गर्भधारणेचा कालावधी आणि गर्भाची नेमकी स्थिती तपासणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी वैद्यकीय तपासणी आणि सोनोग्राफी महत्त्वाची ठरते.काही महिलांमध्ये गर्भाशयात गर्भधारणा होण्याऐवजी फॅलोपियन ट्यूबमध्ये गर्भधारणा झालेली असू शकते. अशा स्थितीत वैद्यकीय तपासणीशिवाय गर्भपाताची औषधे घेतल्यास गंभीर गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका असतो. अतिरक्तस्राव, गंभीर संसर्ग आणि सेप्टिक शॉक यांसारख्या जीवघेण्या परिस्थिती उद्भवू शकतात.
त्यामुळे औषधांची माहिती मिळाली किंवा ती सहज उपलब्ध झाली म्हणून स्वतःच्या निर्णयाने त्यांचा वापर करणे धोकादायक ठरू शकते.
नागपूर शहरात २५२ अधिकृत गर्भपात केंद्रे
नागपूर शहरात गर्भपाताची कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी २५२ अधिकृत एमटीपी केंद्रे उपलब्ध आहेत. असे असतानाही काही महिला डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे घेत असल्याचे समोर येत आहे.नागपूर महापालिकेच्या माता व बालसंगोपन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही गर्भपाताची औषधे स्वतःहून घेऊ नयेत, असे स्पष्ट केले आहे. गर्भपाताची प्रक्रिया कायदेशीर आणि मान्यताप्राप्त केंद्रांमध्येच पात्र वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली होणे आवश्यक आहे.