इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून पती-पत्नीला धमकी

    दिनांक :17-Nov-2026
Total Views |
नागपूर
AI-Generated Obscene Photos
सध्या आरोपींकडून सोशल मीडियाचा वापर धमकी आणि बदनामी करण्यासाठी केला जात आहे. इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करून एका ६३ वर्षीय व्यक्तीसह त्यांच्या पत्नीला अश्लील शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेली आक्षेपार्ह छायाचित्रे पोस्ट करून दाम्पत्याची बदनामी केली. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी अज्ञात सायबर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



मोहन बाबुरावजी मोबाडे (६३, रा. दर्शनी मंजिरी अपार्टमेंट, लक्ष्मीनगर) आणि त्यांच्या पत्नीला हा त्रास देण्यात आला. २३ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत आरोपीने 'मिसेस प्रधान न्यू केएल मिकादो' आणि 'हरामखोर मोहन' या नावांनी इन्स्टाग्रामवर दोन हँडल तयार केले होते. या अकाउंटच्या माध्यमातून आरोपीने मोबाडे आणि त्यांच्या पत्नीच्या इन्स्टाग्राम आयडीवर आक्षेपार्ह संदेश पाठवले. अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. याशिवाय, एआय तंत्रज्ञानाने तयार केलेली छायाचित्रे पोस्ट करून त्यांची सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार अज्ञात इन्स्टाग्राम वापरकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायबर सेलच्या मदतीने आरोपीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.