नागपूर
Travel Bus नागपूरहून उमरेड-पवनीच्या दिशेने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. चांपा परिसरातील इंडियन पेट्रोल पंपाजवळ काल सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेच्या वेळी बसमध्ये ५० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. बसमधून धूर निघत असल्याचे आणि आगीच्या ज्वाळा दिसताच चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने बस थांबवली. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बसमधून बाहेर काढण्यात आले. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ही खासगी ट्रॅव्हल्स नागपूरहून उमरेड-पवनीकडे जात होती. प्रवास सुरू असतानाच चांपा परिसरातील इंडियन पेट्रोल पंपाजवळ बसला अचानक आग लागली. बसमधून धूर आणि ज्वाळा बाहेर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने क्षणाचाही विलंब न करता बस रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर बसमधील सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. बसला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, बसमध्ये ५० हून अधिक प्रवासी असतानाही चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्वांचे प्राण वाचले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. चालकाच्या सतर्कतेचे आणि धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे.