दुष्काळाला राष्ट्रसंतांचे विचारच तारक : आ. वानखेडे

    दिनांक :17-Nov-2026
Total Views |
आर्वी,
mla-wankhede तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगतीच्या जोरावर माणूस चंद्र, मंगळावर जाऊन आला. पुढेही प्रगतीचे शिखर गाठत असताना निसर्गाची ताकद ओळखून मानवाने कर्तव्यात कसूर न करता जबाबदारीने वागले पाहिजे, अन्यथा येत्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी माणसाला माणसाच्या विरोधातच युद्ध करावे लागेल. अशा कठीण काळात राष्ट्रसंतांचा ग्रामगीतेतील जलसंधारण आणि मनसंधारणाचा मौलिक विचाराच दुष्काळाशी दोन हात करू शकतो, असे प्रतिपादन आमदार सुमित वानखेडे यांनी केले. आदर्श ग्राम मिर्झापूर नेरी येथील दिवाळी स्नेहमिलन व दुष्काळ निवारणार्थ आयोजित ग्रामस्थांशी संवाद व सामुदायिक प्रार्थनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच बाळा सोनटके, डॉ. प्रमोद जाणे, अशोक भट्टड, उखंडराव भांगे, शामराव वाळके यांची उपस्थिती होती.
 
 
mla-wankhede
 
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सरपंच बाळा सोनटके यांच्या नेतृत्वात मिर्झापूर नेरीने जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे ५० लाखांचे पारितोषिक प्राप्त केले. याबद्दल ग्रामस्थांच्या एकजुटीचे व समर्पण वृत्तीचे कौतुकही आ. वानखेडे यांनी केले. सरपंच सोनटके यांनीही गावात केलेल्या विकास कामांची माहिती दिली. ग्रामपंचायत अधिकारी संजय यावले यांनी अभियान कालावधीत केलेल्या विविध कामाची माहिती दिली.
 
 
दरम्यान, मिर्झापूर नेरी येथे गुरुदेव सेवा मंडळाचा वारसा निर्माण करणारे रामचंद्र कोल्हे, लक्ष्मण खांडेकर, महादेव वाटकर, पंजाब सोनटके, भीमराव तुमसकर, शामराव वानखडे या दिवंगत गुरुदेव सेवकांनी सामुदायिक प्रार्थना व सामुदायिक ध्यान ही परंपरा कायम ठेवत पुढील पिढीला वारसा देऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार कायम जतन केले, याबद्दल त्यांना श्रद्धांजली
अर्पण करण्यात आली.
 
सामुदायिक प्रार्थनेत आमदारांनी वाजवली खंजिरी
सामुदायिक प्रार्थनेत आमदार सुमित वानखेडे यांनी सहभागी होत भजनात दंग होऊन खंजिरीवर थाप मारत आध्यात्मिक वातावरणाचा आनंद घेतला. यावेळी आमदार वानखेडे यांचा उपरणे व भगवी टोपी देऊन बाल गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात उत्कृष्ट काम करणार्‍या ग्रामपंचायत अधिकारी, शेतकरी, गुरुदेव सेवा मंडळाचे सेवाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.