पुण्यातील रायफल्स आता यूपी STF च्या ताफ्यात

    दिनांक :17-Nov-2026
Total Views |
पुणे
Rifles Join
देशाच्या संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी उत्पादन क्षमतेला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडीत पुण्यातील भारत फोर्ज कंपनीने उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सला (यूपीएसटीएफ) अत्याधुनिक रायफल्सचा पुरवठा सुरू केला आहे. कंपनीच्या मुंढवा येथील उत्पादन प्रकल्पात तयार करण्यात आलेल्या ५.५६ बाय ४५ मिमी रायफल्सच्या पहिल्या खेपेला केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमामुळे देशांतर्गत संरक्षण साहित्य निर्मिती क्षेत्रातील भारत फोर्जची भूमिका अधोरेखित झाली आहे.





बाबा कल्याणी यांनी केले स्वागत

अमित शहा यांनी पुण्यातील कल्याणी-भारत फोर्जच्या उत्पादन प्रकल्पाला भेट दिली. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पद्मभूषण बाबा कल्याणी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भारत फोर्जच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शहा यांच्या हस्ते विशेष स्मृतिफलकाचे अनावरण करण्यात आले.

या भेटीदरम्यान शहा यांनी कारखान्यातील फोर्जिंग विभागांची पाहणी केली. कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी कंपनीचा औद्योगिक प्रवास, उत्पादन क्षमता आणि तांत्रिक प्रगतीची माहिती घेतली. भारताच्या उत्पादन आणि संरक्षण क्षेत्रातील क्षमता वाढविण्यासाठी कंपनीकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.भारत फोर्जची पूर्ण मालकी असलेली कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (केएसएसएल) ही कंपनीच्या संरक्षण व्यवसायाची प्रमुख उपकंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या स्वदेशी संरक्षण साहित्याची निर्मिती केली जाते.

अमित शहा यांच्या भेटीदरम्यान लहान शस्त्रे, तोफखाना प्रणाली, दारूगोळा प्रणाली आणि हवाई, जमिनीवरील तसेच सागरी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या मानवरहित यंत्रणांचे सादरीकरण करण्यात आले. देशांतर्गत विकसित आणि उत्पादित करण्यात आलेल्या या संरक्षण उत्पादनांची माहितीही त्यांना देण्यात आली.संरक्षण क्षेत्रातील परदेशी आयातीवरील अवलंबित्व कमी करून देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने भारत फोर्जसारख्या उद्योगांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. अभियांत्रिकी, धातुशास्त्र आणि आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानातील अनुभवाच्या आधारे कंपनीने संरक्षण उत्पादन क्षेत्रातही विस्तार केला आहे.

आत्मनिर्भर भारत आणि सशक्त, सुरक्षित भारत या संकल्पनांच्या अनुषंगाने स्वदेशी संरक्षण साहित्य विकसित करण्यावर भर दिला जात आहे. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्ससाठी रायफल्सची पहिली खेप रवाना होणे हा या प्रयत्नांमधील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.पुण्यातील उत्पादन प्रकल्पातून उत्तर प्रदेशच्या विशेष पोलीस दलाला अत्याधुनिक रायफल्सचा पुरवठा सुरू झाल्याने राज्याच्या औद्योगिक आणि संरक्षण उत्पादन क्षेत्राचे महत्त्वही अधोरेखित झाले आहे.