महिला अधिकाऱ्याची कोट्यवधींची माया!

    दिनांक :17-Nov-2026
Total Views |
हैदराबाद
Telangana ACB Raid
सरकारी पदाचा गैरवापर करून उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याची अनेक प्रकरणे यापूर्वी समोर आली आहेत. आता तेलंगणमध्येही असेच एक प्रकरण उघडकीस आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका महिला नगररचना अधिकाऱ्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुंडू वाणी असे या महिला अधिकाऱ्याचे नाव असून, त्या मोइनाबाद नगरपालिकेत टाऊन प्लानिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. प्राथमिक तपासात त्यांच्याकडे कथितरीत्या ६.७६ कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती आढळल्याचा दावा ACB ने केला आहे. दरम्यान, लाचखोरीच्या अन्य एका प्रकरणात त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


ACB च्या पथकाने १६ नोव्हेंबर रोजी गुंडू वाणी यांच्याशी संबंधित आठ ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. यामध्ये त्यांचे निवासस्थान, कार्यालय, नातेवाईकांची ठिकाणे, सहकारी आणि इतर संबंधित ठिकाणांचा समावेश होता. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात चल आणि अचल मालमत्ता आढळून आली. संबंधित मालमत्तेचे मूल्य त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या अधिकृत स्रोतांपेक्षा कितीतरी अधिक असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.


प्लॉट, फ्लॅट आणि तीन मजली इमारतीची मालमत्ता

ACB च्या तपासात गुंडू वाणी यांच्या नावावर आणि संबंधित ठिकाणी असलेल्या अनेक स्थावर मालमत्तांची माहिती समोर आली आहे. महबूबनगर जिल्ह्यातील २८३.११ चौरस यार्ड आणि जनगाव जिल्ह्यातील ४२४ चौरस यार्ड क्षेत्रफळाचे दोन खुले भूखंड अधिकाऱ्यांना आढळले आहेत. या दोन्ही भूखंडांची अंदाजित किंमत ८७.६७ लाख रुपये आहे. याशिवाय ६३ लाख रुपये किमतीचा निवासी फ्लॅट आणि सुमारे २.४५ कोटी रुपये किमतीची तीन मजली निवासी इमारत असल्याचेही तपासात समोर आले आहे.

याशिवाय महबूबनगर जिल्ह्यातील १.१० एकर कृषी जमीनही ACB ने शोधून काढली आहे. या जमिनीची अंदाजित किंमत २९.७० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, जप्त आणि शोधून काढलेल्या मालमत्तांची प्रत्यक्ष बाजारातील किंमत यापेक्षा अधिक असण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

५० लाखांची वाइन व्यवसायात गुंतवणूक, १.३० कोटींचे शेअर्स

छापेमारीदरम्यान गुंडू वाणी यांच्याकडे असलेल्या चल संपत्तीचाही तपशील समोर आला आहे. त्यांच्या घरातून ५.४७ लाख रुपयांची रोकड आढळली. तसेच 'तुलजा भवानी वाइन' या व्यवसायात ५० लाख रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय सुमारे १.३० कोटी रुपयांचे शेअर्सही आढळून आले आहेत.त्यांच्या बँक खात्यात ७.९७ लाख रुपयांची शिल्लक असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच १७५.१ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि सुमारे ५० लाख रुपये किमतीची वाहने आढळली आहेत. या वाहनांमध्ये महिंद्रा XUV700 आणि हुंदाई क्रेटा या मोटारींचा समावेश आहे. घरातील फर्निचर आणि अन्य वस्तूंची अंदाजित किंमतही ५.१० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.ACB ने केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार, गुंडू वाणी यांच्याकडे एकूण सुमारे ६.७६ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा अंदाज आहे. त्यांच्या अधिकृत उत्पन्नाच्या तुलनेत ही संपत्ती कशी जमा झाली, याचा तपास आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जात आहे.