बोर व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीला पर्यटकांची पसंती!

पुढील आठवड्याचेही बुकिंग हाऊसफुल्ल

    दिनांक :17-Nov-2026
Total Views |
मुंबई, पुण्यासह परराज्यातील पर्यटकांचीही मोठी गर्दी
 
सेलू,
bor-tiger-reserve विदर्भातील निसर्गसौंदर्य आणि वन्यजीवांचा अनोखा ठेवा असलेल्या सेलू तालुयातील बोर व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत आहे. बोरधरण सफारी गेट आणि आडेगाव सफारी गेट येथील पुढील आठवड्याचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले असून, पर्यटकांकडून सफारीसाठी मोठ्या उत्साहाने ऑनलाइन बुकिंग केले जात आहे.
 
 
bor-tiger-reserve
 
आतापर्यंत बोर जंगलाची सफारी प्रामुख्याने विदर्भातील पर्यटकांपुरती मर्यादित असल्याचे चित्र होते. मात्र, आता या जंगलाची भुरळ उत्तर महाराष्ट्रासह मुंबई, पुणे आणि राज्याच्या विविध भागांतील पर्यटकांना पडत आहे. एवढेच नव्हे, तर इतर राज्यांमधूनही पर्यटक बोर जंगलाला भेट देण्यासाठी उत्सुकता दाखवत आहेत. त्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पाची लोकप्रियता राज्याच्या सीमा ओलांडून देशभर पोहोचत असल्याचे चित्र दिसत आहे.
 
 
बोर व्याघ्र प्रकल्पाची खास ओळख ठरलेली राणी कॅटरिना व इतर वन्यप्राणी पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत. या वन्यजीवांचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांसह वाइल्ड लाइफ फोटोग्राफर्समध्येही कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. जंगलातील जैवविविधता, निसर्गरम्य वातावरण आणि वन्यप्राण्यांच्या अधिवासाचे जवळून निरीक्षण करण्याची संधी यामुळे बोर सफारीकडे पर्यटकांचा कल वाढत आहे.
 
 
एकेकाळी विदर्भातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या तालुयातील बोर व्याघ्र प्रकल्पाला आता राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. पर्यटकांचा वाढता प्रतिसाद, सफारीचे हाऊसफुल्ल होणारे बुकिंग आणि वन्यजीव छायाचित्रकारांची वाढती उपस्थिती पाहता, भविष्यात बोर व्याघ्र प्रकल्प ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांच्या धर्तीवर देशातील प्रमुख व्याघ्र पर्यटनस्थळांमध्ये आपले स्थान निर्माण करू शकतो. त्यासाठी पर्यटनाच्या पायाभूत सुविधा, वन्यजीव संवर्धन आणि पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देणे आवश्यक आहे.
 
बोरचे वन्यजीवसंपदा, निसर्गसौंदर्य आकर्षण
बोरच्या जंगलातील वन्यजीवसंपदा आणि निसर्गसौंदर्य आता पर्यटकांना आकर्षित करू लागले असून, वर्धा जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी ही निश्चितच आशादायक बाब ठरत असल्याची प्रतिक्रीया वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन बोरकर यांनी दिली.