मोदींच्या नेतृत्वाचे ट्रम्प यांच्याकडून कौतुक!

    दिनांक :17-Nov-2026
Total Views |
मनिला (फिलिपिन्स),
trump-praises-modis-leadership अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्वाड देशांच्या नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. मोदी हे अत्यंत कणखर व्यक्तिमत्त्वाचे नेते असल्याचे सांगत ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेदरम्यान चांगले संबंध असल्याचे अधोरेखित केले. तसेच क्वाडमधील चारही देशांमधील मैत्री आणि सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर दिला.
 
trump-praises-modis-leadership
 
फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे झालेल्या या बैठकीत ट्रम्प यांनी भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या नेत्यांशी असलेल्या संबंधांचाही उल्लेख केला. या देशांतील नेत्यांशी आपले जुने आणि चांगले संबंध असून ते सर्व आपले मित्र आहेत, असे त्यांनी सांगितले. या मैत्रीमुळे परस्पर सहकार्याच्या दृष्टीने अनेक गोष्टी सोप्या होतात, असेही ट्रम्प म्हणाले.
 
क्वाड गटाच्या वाढत्या सहकार्याबाबत बोलताना ट्रम्प यांनी हे वर्ष महत्त्वाचे ठरल्याचे नमूद केले. या गटाला नव्याने बळ मिळाले असून सदस्य देशांमधील भागीदारी आणि मैत्री अधिक दृढ झाली आहे. मुक्त, सुरक्षित, स्थिर आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक क्षेत्र निर्माण करण्यासाठी चारही देश एकत्रितपणे काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रादेशिक सुरक्षा आणि आर्थिक सहकार्याच्या मुद्द्यांवरही सदस्य देश एकमेकांना सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
संरक्षण क्षेत्रातील सहकार्याचा उल्लेख करताना ट्रम्प यांनी क्वाडमधील देश संयुक्त लष्करी सराव करणार असल्याची माहिती दिली. अमेरिकेकडे जगातील सर्वाधिक शक्तिशाली पाणबुड्या असल्याचा दावाही त्यांनी केला. आगामी १२ महिन्यांत अमेरिका असे काही करणार आहे, ज्यामुळे जग आश्चर्यचकित होईल, असे विधान त्यांनी केले. याशिवाय पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या क्वाड गटात आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी अमेरिका मोठी गुंतवणूक करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. तसेच २०२७ मध्ये क्वाड देशांची आर्थिक शिखर परिषद आयोजित केली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. संरक्षण, सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित विषयांवर चारही देशांमधील समन्वय वाढवण्याच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
दरम्यान, क्वाड हा चार देशांचा सामरिक सहकार्य गट असून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शांतता, स्थैर्य आणि सुरक्षितता टिकवून ठेवणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मनिला येथे क्वाड बैठकीसोबतच आसियान-भारत शिखर परिषदही आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध देशांचे नेते सहभागी झाले होते.