१०० मीटर खोल दरीत कोसळली बस ८ जणांचा मृत्यू

    दिनांक :17-Nov-2026
Total Views |
टिहरी गढवाल
Uttarakhand Bus Accident
उत्तराखंडमध्ये मंगळवारी पहाटे भीषण बस दुर्घटना घडली. टिहरी गढवाल जिल्ह्यातील गूलर बाजाराजवळ प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून सुमारे १०० मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, सुमारे २० प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), अग्निशमन दल आणि आरोग्य यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.




प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर पहाटे सुमारे ४ वाजून ३० मिनिटांनी घडला. ऋषिकेश येथून चमोलीच्या दिशेने जाणाऱ्या या बसमध्ये अंदाजे ३० ते ३५ प्रवासी होते. गूलर आणि शिवपुरी परिसरातील पुलाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत आठ प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य प्रवासी जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच मुनिकीरेती पोलीस ठाणे, गूलर चौकी, शिवपुरी चौकी, ब्यासी चौकी तसेच परिसरातील अन्य पोलीस पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ब्यासी आणि ढालवाला येथील एसडीआरएफच्या पथकांनाही त्वरित पाचारण करण्यात आले. त्याचबरोबर अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकांची मदत घेण्यात आली. पोलीस, एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी संयुक्तपणे बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत २० जखमी प्रवाशांना दरीतून बाहेर काढून रस्त्यापर्यंत आणण्यात आले असून, रुग्णवाहिकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टिहरीचे जिल्हाधिकारी यांनीही या दुर्घटनेबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, गूलर बाजाराजवळ बस पुलावरून जवळपास १०० मीटर खोल दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. नरेंद्रनगरचे क्षेत्राधिकारी आणि मुनिकीरेती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. टिहरी पोलिसांकडून बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू असून, दुर्घटनेतील इतर प्रवाशांचा शोध घेण्याचे काम अद्याप सुरू आहे.

दरम्यान, या भीषण दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. टिहरी गढवाल जिल्ह्यात झालेल्या अपघातात जीवित आणि मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त समजून अत्यंत दुःख झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या कठीण प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांप्रति त्यांनी मनापासून संवेदना व्यक्त केल्या असून, जखमी प्रवाशांना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थनाही केली आहे.दरम्यान, उत्तराखंडमध्ये अलीकडच्या काळात झालेली ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. यापूर्वी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी जोशीमठ परिसरात हेलिकॉप्टर कोसळण्याची दुर्घटना घडली होती. बद्रीनाथ धाम येथून सहा प्रवाशांना घेऊन ट्रान्स भारत कंपनीचे हेलिकॉप्टर देहरादूनमधील सहस्त्रधारा येथे जात होते. मात्र, खराब हवामानामुळे चाई आणि थायंग गावांदरम्यान हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सलग घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे उत्तराखंडमधील प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.