जयपूर,
zaheers-grand-style माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे सध्या कुटुंबातील विवाहसोहळ्यामुळे चर्चेत आहेत. सागरिकाचा भाऊ शिवजीत घाटगे याचा विवाह जयपूरमधील चौमुन येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. या शाही विवाहसोहळ्याला मनोरंजन आणि क्रिकेट क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून झहीर, सागरिका आणि त्यांचा मुलगा फतेह सिंग यांच्या खास अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मेहुण्याच्या लग्नासाठी झहीर खानने खास पारंपरिक पोशाखाची निवड केली होती. काळ्या रंगाची बंदगला शेरवानी, पांढरा पायजमा आणि डोक्यावर गुलाबी रंगाची पगडी अशा राजेशाही पेहरावात तो अतिशय देखणा दिसत होता. लग्नातील एका व्हिडिओमध्ये झहीर कुटुंबीयांसोबत छायाचित्रांसाठी पोझ देताना दिसत आहे. यावेळी त्याने मुलगा फतेह सिंगला मांडीवर घेतले होते. दोघांचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
दुसरीकडे, सागरिका घाटगेनेही आपल्या भावाच्या लग्नात पारंपरिक सौंदर्याची झलक दाखवली. चमकदार सॅटिन-सिल्क साडी, गळ्यात आकर्षक नेकलेस आणि कानात जुळणारे दागिने असा तिचा लूक होता. कपाळावरील टिळा, बांधलेले केस आणि हलक्या मेकअपमुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली होती. लग्नातील एका व्हिडिओमध्ये सागरिका नवरदेव असलेल्या आपल्या भावाची आरती करताना दिसत आहे. भावाच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरील आनंदही स्पष्टपणे पाहायला मिळतो. या विवाहसोहळ्यात झहीर आणि सागरिकाचा मुलगा फतेह सिंग यानेही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. क्रीम आणि सोनेरी रंगाच्या पारंपरिक कुर्ता-पायजम्यात तो अतिशय गोंडस दिसत होता. कौटुंबिक छायाचित्रांमध्ये वडिलांच्या मांडीवर बसलेल्या फतेहची झलक सोशल मीडियावर विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.
शिवजीत घाटगे आणि पल्लवी यांचा विवाह महाराष्ट्रीयन परंपरेनुसार पार पडला. जयपूरच्या शाही वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात पारंपरिक विवाहविधींसह कुटुंबातील आनंदाचे क्षणही पाहायला मिळाले. सागरिकाचे भावासाठीचे प्रेम, झहीरचा राजेशाही पेहराव आणि चिमुकल्या फतेहची गोड उपस्थिती यामुळे हा विवाहसोहळा विशेष चर्चेत आला आहे.