कोलकाता,
american-company-enters-kkr इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाच्या मालकी हक्कात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. संघाचे सहमालक जय मेहता आपल्याकडील ४५ टक्के हिस्सेदारीपैकी निम्मा हिस्सा अमेरिकेतील एरेस मॅनेजमेंट या गुंतवणूक कंपनीला विकणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यास केकेआरच्या मालकीमध्ये आणखी एका भागीदाराचा समावेश होणार आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, जय मेहता केकेआरमधील २२.५ टक्के हिस्सा विक्रीस काढत आहेत. या व्यवहाराचे मूल्य अंदाजे ४०० दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे ३,७३० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या व्यवहारानुसार कोलकाता नाइट रायडर्सचे एकूण मूल्यांकन १.७८ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास १६,६३४ कोटी रुपये इतके निश्चित झाले आहे. स्पोर्टिकोने केलेल्या मूल्यांकनातील १.७३८ अब्ज डॉलर या आकड्याच्या जवळपास हे मूल्यांकन आहे.
एरेस मॅनेजमेंट ही अमेरिकेतील गुंतवणूक कंपनी असून जागतिक क्रीडा क्षेत्रातील अनेक मोठ्या संस्थांमध्ये तिची भागीदारी आहे. इंग्लिश प्रीमियर लीगमधील चेल्सी फुटबॉल क्लब आणि अमेरिकेतील एनएफएल संघ मियामी डॉल्फिन्स यांच्याशीही या कंपनीचा संबंध आहे. केकेआरमध्ये सध्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची सर्वाधिक म्हणजे ५५ टक्के हिस्सेदारी आहे, तर जय मेहता यांच्याकडे ४५ टक्के मालकी आहे.
जय मेहता आणि एरेस मॅनेजमेंट यांच्यातील प्रस्तावित व्यवहार रोख स्वरूपात होणार असून त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतरच हा व्यवहार पूर्ण होऊ शकणार आहे. बीसीसीआयकडून नव्या गुंतवणूकदाराची आवश्यक तपासणी केली जाईल. या व्यवहारातून बीसीसीआयला एकूण व्यवहारमूल्याच्या पाच टक्के रक्कम मिळणार असल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, आयपीएल २०२७ च्या मिनी लिलावापूर्वी केकेआरने १७ खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. त्यामुळे संघाकडे आठ जागा रिक्त असून त्यापैकी तीन जागा परदेशी खेळाडूंसाठी आहेत. लिलावासाठी केकेआरच्या खात्यात ४१.६५ कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. त्यामुळे मालकी हक्कातील संभाव्य बदलासोबतच आगामी लिलावात संघ कोणत्या खेळाडूंना संधी देणार, याकडेही क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.