अर्शदीपची आयसीसी क्रमवारीत मोठी झेप!

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
arshdeep-makes-a-big-leap-in-icc-rankings भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या एकदिवसीय क्रमवारीत दमदार प्रगती केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील प्रभावी कामगिरीच्या जोरावर त्याने गोलंदाजांच्या क्रमवारीत तब्बल १२ स्थानांची झेप घेत संयुक्तपणे १९ वे स्थान मिळवले आहे. त्यामुळे अर्शदीपने अव्वल २० गोलंदाजांमध्ये स्थान मिळवण्यात यश मिळवले आहे.
 
arshdeep-makes-a-big-leap-in-icc-rankings
 
या क्रमवारीत अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खान याने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीने १५ स्थानांची प्रगती करत संयुक्तपणे १२ वे स्थान मिळवले, तर काईल जेमिसननेही १५ स्थानांची झेप घेत ४५ वे स्थान गाठले आहे. दरम्यान, इंग्लंडचा फलंदाज टॉम बँटन यालाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीचा मोठा फायदा झाला आहे. ॲडलेड येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने अवघ्या ९९ चेंडूंमध्ये १२१ धावांची खेळी केली होती. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरे शतक ठरले. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडने सामना जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या कामगिरीनंतर बँटनने फलंदाजांच्या क्रमवारीत ३४ स्थानांची झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम १३ वे स्थान मिळवले आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट यानेही अर्धशतकाच्या जोरावर दोन स्थानांची सुधारणा करत नववे स्थान पटकावले.
 
इंग्लंडच्याच जोफ्रा आर्चरनेही गोलंदाजांच्या क्रमवारीत प्रगती केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांतील प्रभावी गोलंदाजीमुळे तो चार स्थानांनी वर चढत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनरची एका स्थानाने घसरण झाली असून तो आता पाचव्या क्रमांकावर आहे.
 
अर्शदीपने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यातही आपली छाप पाडली होती. त्याने ३० धावा देत तीन फलंदाजांना माघारी धाडले. त्यानंतर फलंदाजीतही चार चेंडूंचा सामना करत दोन षटकारांच्या मदतीने १४ धावा केल्या. या दुहेरी योगदानामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. भारतीय संघाने ही मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली.