सेलू,
bear-that-wreaked-havoc-in-zhadshi-captured हिंगणी वनपरिक्षेत्रातील झडशी परिसरात काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलीला वनविभागाने सुरक्षित रेस्क्यू करून पिंजऱ्यात बंद केले. ही कार्यवाही वडगाव शिवारात आंजी-अकोली मार्गालगत नदी परिसरात करण्यात आली. धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलीला पिंजराबंद करण्यात आल्याने झडशी भागातील शेतकरी, शेतमजूर व नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
झडशी सहवनक्षेत्रांतर्गत अकोली, आमगाव, रिधोरा, तामसवाडा, बोरखेडी (कला), गिरोली इत्यादी गावांच्या जंगलालगतच्या शेतशिवारात अस्वल काही महिन्यांपासून मुक्त संचार करीत होती. शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजूर तसेच परिसरातील नागरिकांना या अस्वलाचा वारंवार सामना करावा लागत होता. आमगाव येथील शेतकरी गौळकर यांच्यावर अस्वलाने हल्ला करून त्यांना जखमी केले होते. त्यामुळे या अस्वलाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक वनविभागाकडे करीत होते.
वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह आर.आर.टी. रेस्क्यू चमू हिंगणी यांनी अस्वलाला पकडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. जवळपास १५ ते २० दिवस दिवस-रात्र गस्त घालत अस्वलाच्या हालचालींवर लक्ष ठेवले. त्यानंतर अखेर वडगाव शिवारात अस्वलाचा मागोवा घेत अस्वलीला पिंजऱ्यात बंद करण्यात आले. ही कार्यवाही उपवनसंरक्षक हरवीर सिंग, सहायक वनसंरक्षक हरीलाल सरोदे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी मीनल तुरखडे, मानद वन्यजीव रक्षक कौस्तुभ गावंडे, सुनील कोटजावरे, वनरक्षक काळे, वनरक्षक काळबांडे, धुर्वे, अभिषेक खेडूलकर, ऋषिकेश घोडसे यांनी केली.