कटिहार
Bihar Katihar Road Accident बिहारमधील कटिहार जिल्ह्यात गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात एकाच गावातील तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. ट्रक, टेम्पो आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेली धडक इतकी जोरदार होती की तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, विष्णुचक गावावर शोककळा पसरली आहे.

कटिहार जिल्ह्यातील पोठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३१ वरील बखरी मोडजवळ हा अपघात घडला. गुरुवारी सकाळी ट्रक, टेम्पो आणि ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटल्याने त्यांची एकमेकांना जोरदार धडक बसली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २४ वर्षीय मनीष कुमार साह हा तरुण गंभीर जखमी झाला. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला.
अपघाताच्या वेळी परिसरात धुके पसरले होते. त्यामुळे कमी दृश्यमानतेमुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटून ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र, प्राथमिक माहितीनुसार वाहनांचे नियंत्रण सुटणे हे अपघाताचे संभाव्य कारण मानले जात आहे. नेमकी दुर्घटना कशामुळे घडली, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची ओळख पटली असून, जितेंद्र कुमार (२२), भीम कुमार साह (३५) आणि बाजू कुमार साह (३२) अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही कटिहार जिल्ह्यातील समेली प्रखंडातील विष्णुचक गावातील प्रभाग क्रमांक नऊचे रहिवासी होते. या दुर्घटनेत जखमी झालेल्या मनीष कुमार साह याला उपचारासाठी कटिहार मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांना दुर्घटनेची माहिती दिली. तसेच अपघाताचा तपास सुरू करून पुढील कायदेशीर प्रक्रिया हाती घेतली आहे.
एकाच गावातील तीन तरुणांचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने विष्णुचक गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी घडलेल्या या घटनेची बातमी गावात पोहोचताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मृतांच्या नातेवाइकांचा आक्रोश सुरू असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.