दिवाळी अंक प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी स्तुत्य उपक्रम

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
बुलढाणा
Buldhana Diwali Magazine
वाचन संस्कृतीचे संवर्धन करणे, मराठी साहित्याची समृद्ध परंपरा जपणे आणि नव्या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे यासाठी दिवाळी अंक प्रदर्शनासारखे उपक्रम महत्त्वपूर्ण व स्तुत्य आहेत, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.




जिल्हा ग्रंथालय कार्यालय, बुलढाणा येथे वाचकांसाठी विविध विषयांवरील दिवाळी अंकांचे आकर्षक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन उपशिक्षणाधिकारी प्रकाश खुळे आणि सहायक प्रशासन अधिकारी अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी प्रदर्शनातील विविध दिवाळी अंकांची पाहणी केली. त्यामध्ये समाविष्ट असलेले साहित्य, कथा, कविता, वैचारिक लेख तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनपर विषयांवरील माहिती जाणून घेतली. दिवाळी अंक हे मराठी साहित्यविश्वातील महत्त्वाचे सांस्कृतिक दालन असून, त्यातून साहित्यिक, वैचारिक आणि सामाजिक घडामोडींचे प्रतिबिंब उमटते. अशा प्रदर्शनांमुळे वाचकांना विविध साहित्यप्रकारांचा परिचय होण्यासोबतच वाचनाची गोडी वाढण्यास मदत होते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

या प्रदर्शनात विविध साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि मनोरंजनपर दिवाळी अंक मांडण्यात आले होते. प्रदर्शनाला वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कैलास गव्हाळे यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या या उपक्रमामुळे वाचकांना विविध दिवाळी अंकांचा परिचय करून घेण्याची आणि मराठी साहित्याच्या वैविध्यपूर्ण विश्वाचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध झाली.
000000