चंद्रपुरात आढळले व्यक्तीचे शीर व धड

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
चंद्रपूर,
Chandrapur Crime News शहरातील अत्यंत वर्दळीच्या प्रियदर्शनी इंदिरा चौक परिसरात व्यक्तीचे कापलेले शीर, तर त्या लगतच्या रेल्वे उड्डाणपुलाखाली इरोज लॉन परिसरात कुजलेल्या अवस्थेतील उर्वरित धड आढळून आहे. ही धक्कादायक घटना बुधवार, 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. रामनगर पोलिसांच्या तत्परतेमुळे काही तासांत मृत व्यक्तीची ओळख बंगाली कॅम्प परिसरातील प्रभास सरकार (70) अशी पटली आहे.

काही नागरिकांना बुधवारी सकाळच्या सुमारास प्रियदर्शिनी चौकाजवळी पाण्याच्या टाकी परिसरात एक मानवी शीर निदर्शनास आले. ही बातमी वार्‍यासारखी पसरातच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. घटनेची माहिती कळताच रामनगर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करून शिराची प्राथमिक पाहणी केली असता ते पूर्णत: कुजलेले व त्याचा काही भाग भटक्या श्‍वानांनी खाल्याचे दिसून आले. पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक चमू आणि श्‍वान पथकाला पाचारण करून परिसरात कसून शोधमोहीम राबवली. तपासादरम्यान प्रियदर्शिनी चौकापासून अगदी जवळच असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाखाली एका विशालकाय पडक्या जाहिरात फलकाजवळ शीर नसलेले धड आढळून आले. या धडाचाही काही भाग श्‍वानांनी खाल्ल्यांचे दिसून आले. पोलिसांनी पंचनामा करून अवशेष व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.

तपासादरम्यान मृतक व्यक्ती बंगाली कॅम्पचा रहिवासी प्रभास सरकार असल्याचे स्पष्ट झाले. प्रभास सरकार हे 11 नोव्हेंबर रोजी घरातून निघून गेले होते. पण परत आले नाही. त्यानंतर कुटुंबाने 13 नोव्हेंबर रोजी रामनगर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली होती. मृत व्यक्तीचे डोके आणि धड वेगवेगळ्या ठिकाणी सापडल्याने अनेक गंभीर प्रश्‍न उभे राहिले असून, घटनेचा पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे.