पुणे,
cyclone-akvan-andhra-pradesh-alertबंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे वादळात रूपांतर झाले असून, येत्या दोन दिवसांत या वादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. हे वादळ २० नोव्हेंबरच्या रात्री आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज असून, यावेळी ताशी १२० ते १४५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभरात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकणारे हे तिसरे वादळ आहे.
दक्षिण-पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले 'अकवान' वादळ ताशी तीन किलोमीटर वेगाने उत्तर-उत्तर-पश्चिम दिशेने भारतीय भूभागाच्या दिशेने सरकत आहे. मंगळवारी हे वादळ चेन्नईच्या पूर्वेला समुद्रात सुमारे ६०० किलोमीटर अंतरावर होते. तसेच आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम आणि विशाखापट्टणमच्या दक्षिण-पूर्वेला ६५० किलोमीटर, तर ओदिशातील गोपाळपूरपासून सुमारे ७४० किलोमीटर अंतरावर त्याचे केंद्र होते.
वादळाचा प्रवास उत्तर-उत्तर-पश्चिम दिशेने सुरू असून, १९ नोव्हेंबरपर्यंत त्याचे अतितीव्र वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लोर ते विशाखापट्टणमदरम्यानच्या किनारपट्टीवर २० नोव्हेंबरच्या रात्री हे वादळ धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.