मुंबई,
date-set-for-the-ipl-auction आयपीएलच्या आगामी २०२७ हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) लिलावाची तारीख आणि वेळ निश्चित केली आहे. येत्या १६ डिसेंबर रोजी गोव्यात हा लिलाव पार पडणार असून सकाळी ११ वाजता त्याला सुरुवात होईल. यंदा प्रथमच लिलावाची प्रक्रिया दिवसा पार पडणार असल्याने क्रिकेटप्रेमींचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे.
आयपीएलमधील सर्व दहा संघांनी आपल्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी निश्चित केली असून अनेक नामांकित खेळाडूंना संघातून मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी लिलावात कोणत्या खेळाडूवर कोणता संघ मोठी बोली लावणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. यापूर्वी लिलावाची प्रक्रिया अनेकदा संध्याकाळी सुरू होऊन मध्यरात्रीपर्यंत चालत असे. मात्र, यंदा सकाळी ११ वाजता लिलाव सुरू होणार असल्याने तो संध्याकाळपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
या लिलावात दहा संघांना मिळून एकूण ६६ खेळाडूंची रिक्त स्थाने भरता येणार आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त २५ परदेशी खेळाडूंचा समावेश असेल. खेळाडू कायम ठेवण्याच्या प्रक्रियेत गुजरात टायटन्सने सर्वाधिक २२ खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. तर चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी प्रत्येकी १९ खेळाडूंना पुन्हा संधी दिली आहे.
लिलावासाठी उपलब्ध असलेल्या रकमेत लखनौ सुपर जायंट्स आघाडीवर आहे. या संघाकडे सध्या ४७.४५ कोटी रुपये शिल्लक आहेत. कोलकाता नाइट रायडर्सकडे ४१.६५ कोटी रुपये, सनरायझर्स हैदराबादकडे सुमारे ४० कोटी रुपये आणि दिल्ली कॅपिटल्सकडे जवळपास ३९ कोटी रुपये उपलब्ध आहेत. दुसरीकडे गुजरात टायटन्सकडे सर्वात कमी म्हणजे नऊ कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम शिल्लक आहे. त्यामुळे १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या लिलावात कोणते संघ आपल्या रिक्त जागा भरतात आणि कोणत्या खेळाडूंना मोठी किंमत मिळते, याकडे आयपीएल चाहत्यांचे लक्ष असणार आहे.