मुंबई
Deepali Sayed रुपाली चाकणकर यांच्या ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनचा मुद्दा सध्या चर्चेत असतानाच अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या व्यक्तींविरोधात चित्रपट तयार केला जात असेल, तर त्याला विरोध करण्याऐवजी पाठिंबा द्यायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच, चित्रपटाला विरोध करण्यापूर्वी प्रेक्षकांनी तो पाहावा आणि त्यानंतरच आपले मत व्यक्त करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी चित्रपटावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटातून महिलांचे शोषण आणि भोंदूगिरी यांसारख्या विषयांवर भाष्य करण्यात येणार असल्याचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी सांगितले आहे. दरम्यान, आपल्या नावाचा, छायाचित्राचा आणि वैयक्तिक शैलीचा परवानगीशिवाय वापर केल्यास कायदेशीर कारवाई करू, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर दिपाली सय्यद यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
दिपाली सय्यद म्हणाल्या, “आपण नेमकं काय चुकीचं करतोय, या दृष्टिकोनातून मी या गोष्टीकडे पाहते. महिलांचे शोषण करणाऱ्या व्यक्तीविरोधात आपण चित्रपट बनवत असू, तर त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायला हवा. त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. त्यावेळी त्यांनी असा गोंधळ घातला असता, तर अनेक महिलांचे शोषण थांबले असते.” रुपाली चाकणकर यांच्यामुळे सेन्सॉर बोर्डाला मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
चित्रपटाला विरोध करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाकडे जाण्यात येत असल्याचे आम्हाला सांगितले जात आहे. ‘तुम्ही चित्रपट आणू नका’, असेही सांगितले जात असल्याचा दावा दिपाली यांनी केला. सेन्सॉर बोर्डाला ‘कुणाची ताकद मोठी आहे, ते बघूयात’, असे सांगितले जात असल्याचेही त्या म्हणाल्या. यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
रुपाली चाकणकर यांच्या ट्रेडमार्क नोंदणीवर प्रश्न उपस्थित करताना दिपाली यांनी साडी आणि नावाच्या ट्रेडमार्कचाही मुद्दा उपस्थित केला. “साड्यांवर ट्रेडमार्क करायचा म्हणजे आपण साड्या नेसायच्याच नाहीत का? महाराष्ट्रात करोडोंच्या संख्येने महिला साड्या नेसतात. कितीतरी मुलींची नावं रुपाली आहेत. मग अशा प्रकारचा ट्रेडमार्क कसा असू शकतो?” असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणाला अनेक संस्था विरोध करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
एखादी वाईट घटना घडल्यानंतर भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि लोकांची फसवणूक होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, अशा प्रयत्नांमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. तरीही चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्यापासून कोणालाही रोखता येणार नाही, असा विश्वास दिपाली यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील जनता अशा गोष्टी थांबू देणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
“मी या महाराष्ट्रात राहते. या महाराष्ट्राने मला खूप काही दिले आहे. मग आपल्या जन्मभूमीवर आणि कर्मभूमीवर चुकीच्या गोष्टी आपण कशा खपवून घेणार?” असे म्हणत त्यांनी चित्रपटाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. प्रेक्षकांनी आधी चित्रपट पाहावा आणि त्यानंतर त्यावर बोलावे किंवा विरोध करायचा असल्यास तो करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता दिपाली सय्यद यांच्या या वक्तव्यावर रुपाली चाकणकर काय प्रतिक्रिया देतात, याकडे लक्ष लागले आहे.