एएसआय ७० हजारांची लाच घेताना जेरबंद

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
दिल्ली
Delhi Police ASI Bribery Case
दिल्लीतील लाचखोरीच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोठी कारवाई करत दिल्ली पोलिस दलातील एका सहाय्यक उपनिरीक्षकाला (एएसआय) रंगेहात पकडले. रविंदर कुमार असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, तो भलस्वा डेअरी पोलिस ठाण्यात कार्यरत होता. एका प्रकरणात तक्रारदाराला दिलासा देण्यासह त्याच्या कुटुंबीयांना अटकेपासून वाचवण्याच्या बदल्यात त्याने दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यापैकी ७० हजार रुपये स्वीकारताना सीबीआयच्या पथकाने त्याला अटक केली.



सीबीआयकडे तक्रारदाराने रविंदर कुमार याच्याविरोधात लाच मागितल्याची तक्रार नोंदवली होती. भलस्वा डेअरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका प्रकरणात मदत करण्यासाठी तसेच तक्रारदार आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना अटक न करण्यासाठी एएसआयने दोन लाख रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. तक्रार प्राप्त झाल्यानंतर सीबीआयने त्याच दिवशी आरोपीविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

तक्रारीची प्राथमिक पडताळणी करताना रविंदर कुमार याने खरोखरच दोन लाख रुपयांची मागणी केल्याचे तपास यंत्रणेच्या निदर्शनास आले. त्यानंतर आरोपीने पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. मात्र, मंगळवारी सीबीआयने त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. यावेळी आरोपीने तक्रारदाराकडे पहिल्या हप्त्यातील ७० हजार रुपयांची मागणी केली आणि ही रक्कम स्वीकारली. पैसे घेताच दबा धरून बसलेल्या सीबीआयच्या पथकाने त्याला घटनास्थळीच ताब्यात घेतले. आरोपीकडून लाचेची ७० हजार रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली.

या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सीबीआय तपास करत आहे. लाचेची मागणी आणि रक्कम स्वीकारण्याच्या घटनेमागील इतर बाबींचीही चौकशी केली जात असून, तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.