नवी दिल्ली
Diesel and ATF Windfall Tax Hike केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनाच्या (एटीएफ) निर्यातीवर आकारण्यात येणाऱ्या विंडफॉल टॅक्समध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या नव्या पंधरवड्यासाठी हे सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार, एटीएफच्या निर्यातीवरील कर प्रतिलिटर ११ रुपयांवरून १२.५० रुपये करण्यात आला आहे. तर डिझेलच्या निर्यातीवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (एसएईडी) आणि रस्ते व पायाभूत सुविधा उपकर मिळून आकारला जाणारा कर प्रतिलिटर ११.५० रुपयांवरून १४ रुपये करण्यात आला आहे. दुसरीकडे, पेट्रोलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स मात्र शून्यच ठेवण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने १६ नोव्हेंबर रोजी उशिरा जारी केलेल्या अधिसूचनेत या बदलांची माहिती दिली. सुधारित करदर तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, निर्यात होणाऱ्या इंधनावरील करात वाढ करण्यात आली असली, तरी देशांतर्गत बाजारात वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवरील विद्यमान शुल्कदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २७ मार्च रोजी डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवर विंडफॉल टॅक्स लागू केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे निर्यातदार कंपन्यांना मिळणाऱ्या अतिरिक्त नफ्यावर नियंत्रण ठेवणे, तसेच देशांतर्गत बाजारात पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा पुरवठा कायम राखणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश होता. जागतिक बाजारातील किमती आणि परिस्थितीचा आढावा घेऊन या कराचे दर दर पंधरवड्याला निश्चित केले जातात.
पश्चिम आशियातील तणाव काही प्रमाणात कमी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्येही चढ-उतार सुरू आहेत. Oilprice.com च्या आकडेवारीनुसार, मंगळवारी डब्ल्यूटीआय (WTI) क्रूडच्या किमतीत सुमारे एक टक्क्यांची घसरण होऊन ते प्रति बॅरल ८४.८७ डॉलरवर व्यवहार करत होते. त्याचवेळी ब्रेंट क्रूडच्या किमतीत ०.८७ टक्क्यांची घट होऊन त्याचा दर प्रति बॅरल ९१.६४ डॉलरवर आला होता. देशांतर्गत कमोडिटी बाजारात एमसीएक्सवर १८ डिसेंबर रोजी डिलिव्हरी होणाऱ्या कच्च्या तेलाच्या वायद्याचा भाव १.६१ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ७ हजार ८८० रुपयांवर पोहोचला होता.
दरम्यान, डिझेलवरील विंडफॉल टॅक्स वाढवण्यात आल्यामुळे पेट्रोल पंपांवर डिझेलचे दर वाढणार का, अशी चिंता वाहनचालक आणि सर्वसामान्य ग्राहकांना वाटू शकते. मात्र, या निर्णयामुळे देशांतर्गत ग्राहकांच्या खिशावर कोणताही थेट परिणाम होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. कारण, वाढीव कर केवळ भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या डिझेल आणि विमान इंधनावर लागू होणार आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये या निर्णयामुळे कोणतीही थेट वाढ होणार नाही. निर्यातीवर अतिरिक्त कर आकारून देशांतर्गत इंधन उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या धोरणाचा हा भाग असल्याचे स्पष्ट होते.