सेलू,
Farmers Protest तालुक्यातील हिंगणी येथील सर्वज्ञ जिनिंग अॅण्ड प्रेसिंगकडून मागील वर्षी कापूस खरेदी केलेल्या तब्बल दीडशे शेतकर्यांचे जवळपास चार कोटी रुपये थकीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. वर्ष उलटून गेले मात्र शेतकर्यांच्या हातात त्यांच्या हक्काचा पैसा पडलेला नाही. त्यामुळे शेतकर्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

शेतकर्यांनी पांढरे सोने सर्वज्ञ जिनिंगला विकले. मात्र, त्या कापसाचा मोबदला मिळवण्यासाठी आता त्यांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. सुरुवातीला संस्थेच्या व्यवस्थापकाकडून शेतकर्यांना धनादेश देण्यात आले. मात्र, त्यानंतर हे धनादेश परत घेण्यात आले. शिवाय आरटीजीएसद्वारे पैसे खात्यात जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, हे आश्वासनही हवेतच विरले. दिलेले धनादेश वटले नसल्याने संस्थेच्या आर्थिक व्यवहारांवर आणि व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न शेतकर्यांनी उपस्थित केले.
कष्टाने पिकवलेल्या कापसाचे पैसेच मिळत नसल्याने शेतकर्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने शेतकर्यांचा संयम आता संपत चालला आहे. या प्रकरणी शेतकर्यांनी सहकारमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे धाव घेत न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन दिले. सहकार विभाग, पणन महासंघ आणि जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून थकीत रक्कम शेतकर्यांना मिळवून द्यावी, अशी मागणीही शेतकर्यांनी केली आहे.