गोंदिया,
Gondia Accident भरधाव ट्रकने ई-रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ई-रिक्षातील सात जण जखमी झाले. यामध्ये तीन शाळकरी विद्यार्थिनींचा समावेश असून, चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गोंदिया येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. ही घटना रायपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील भर्रेगाव फाट्याजवळ बुधवारी १८ नोव्हंेबर रोजी सकाळच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ३५ एएच २२०३ क्रमांकाची ई-रिक्षा प्रवाशांना घेऊन जात असताना भर्रेगाव फाट्याजवळ सीजी ०८ एझेड २४५१ क्रमांकाच्या ट्रकने मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ई-रिक्षातील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मदतकार्य करीत जखमींना देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये अनन्या भाऊराव चुटे (१८), गुंजन भाऊराव चुटे (१७), हर्षिता राजेंद्र सरोटे (१७) सर्व राहणार कुंभारटोला, भानुबाई निपुर मडावी (४०), रा. भर्रेगाव, वेदिका संजय गाते (१३) व युक्तिका संजय गाते (४) रा. शिरपूर आणि ई-रिक्षाचालक देवेंद्र संपत सरोटे (४५) रा. शिरपूर यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अनन्या चुटे, हर्षिता सरोटे, वेदिका गाते आणि भानुबाई मडावी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची चौकशी देवरी पोलिस करीत आहेत.
ई-रिक्षा वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न
या घटनेमुळे ग्रामीण भागातील ई-रिक्षा वाहतुकीच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ई-रिक्षांमधून प्रवासी वाहतूक करताना निर्धारित क्षमतेचे पालन केले जाते की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, या अपघातात शाळकरी विद्यार्थिनी जखमी झाल्याने पालकवर्गातही चिंतेचे वातावरण आहे.