गोंदिया,
Prakash Abitkar ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा स्थानिक स्तरावरच उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनी येथे भेट देऊन उपलब्ध वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधत त्यांनी आरोग्यविषयक समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. प्रसंगी नागरिकांनी आरोग्य केंद्रातील आरोग्य सुविधाच्या विस्ताराची अपेक्षा व्यक्त करून नेत्ररोग तज्ज्ञांची सेवा सुरू करण्यासह टायफाईडवरील औषधोपचार, रक्त तपासणी आणि एक्स-रे सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. ग्रामीण रुग्णांना किरकोळ तपासण्यांसाठीही दूरच्या ठिकाणी जावे लागू नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

आरोग्यमंत्र्यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) उपचार व आरोग्य सुविधांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. शासकीय आरोग्य सेवेमुळे मिळालेल्या उपचारांबाबत लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, आरोग्य विभागाच्या ‘तिशीचा पल्ला तपासणी’ उपक्रमाचाही त्यांनी आढावा घेतला. या उपक्रमांतर्गत किती नागरिकांची तपासणी झाली, नागरिकांना तपासणीसाठी कशा प्रकारे प्रोत्साहित केले जात आहे, याची माहिती घेतली. उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्य तपासणीबाबतही विचारणा केली. नियमित आरोग्य तपासणीमुळे आजारांचे वेळीच निदान होऊन योग्य उपचार घेणे शक्य होते, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवा
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. अधिकाधिक नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून उपचारांचा लाभ मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी सक्रियपणे काम करावे, असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. नागरिकांना स्थानिक पातळीवर आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, आरोग्य सेवांचा दर्जा उंचावणे आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाने तत्परतेने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
...