मुंबई
Hero Ki Horrorine निर्माती एकता आर. कपूर आपल्या आगामी चित्रपटांच्या यादीत आणखी एका हॉररपटाची भर घालत आहेत. ‘हीरो की हॉरॉरोइन’ या चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शक साजिद खान आणि निर्माता अमर बुटाला यांच्यासोबत काम केले आहे. बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी समाजमाध्यमांवर जाहीर केली आहे. भय, विनोद आणि प्रेमकथेचा अनोखा संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना रहस्य आणि मनोरंजनाची मेजवानी मिळण्याची अपेक्षा आहे.

‘हीरो की हॉरॉरोइन’च्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करताना निर्मात्यांनी एक भयावह व्हिडिओही शेअर केला आहे. चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच फेब्रुवारी २०२७ मध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या घोषणेसोबत निर्मात्यांनी, ‘हिरोईन मन जिंकते, तर हॉरॉरोइन थेट मन खाते. २०२७ मध्ये त्यांना भेटण्यासाठी तयार राहा. शुक्रवार १३ तारीख आता आणखी भयानक झाली आहे,’ अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने हिंदी मनोरंजनविश्वातील निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातील तीन महत्त्वाची नावे एकत्र आली आहेत.
एकता कपूर यांनी यापूर्वीही हॉरर प्रकारातील अनेक प्रकल्पांना पाठबळ दिले आहे. ‘भूत बंगला’ आणि ‘द वन’ हे त्यांचे अलीकडील हॉररपटांशी संबंधित प्रकल्प आहेत. दूरचित्रवाणी मालिकांमधून अलौकिक आणि रहस्यमय कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यापासून ते मोठ्या पडद्यावरील चित्रपटांपर्यंत त्यांनी या विषयात रस दाखवला आहे. प्रेक्षकांना गूढ आणि अनाकलनीय घटनांविषयी असलेली उत्सुकता लक्षात घेऊन त्या सातत्याने अशा कथांना संधी देत आल्या आहेत. ‘हीरो की हॉरॉरोइन’च्या माध्यमातून त्या पुन्हा एकदा हॉरर प्रकारातील चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद खान करणार असून, या प्रकल्पातून ते दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन करत आहेत. ‘हाऊसफुल’, ‘हाऊसफुल २’ आणि ‘हिम्मतवाला’ यांसारख्या चित्रपटांमुळे ते परिचित आहेत. ‘हीरो की हॉरॉरोइन’ची कथा एका रहस्यमय दुनियेभोवती फिरणार असल्याचे संकेत मिळत असले, तरी कथानक आणि पात्रांबाबत निर्मात्यांनी अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही. सध्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि कलाकारांची माहिती समोर आली आहे.
या चित्रपटाच्या निर्मितीत अमर बुटाला यांचाही सहभाग आहे. ‘बजरंगी भाईजान’, ‘केसरी’ आणि ‘मिशन मजनू’ यांसारख्या चित्रपटांशी ते संबंधित राहिले आहेत. ‘जय हो मीडिया व्हेंचर्स’च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत असून, बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडकडून तो प्रस्तुत केला जाणार आहे. शोभा कपूर, एकता आर. कपूर आणि अमर बुटाला हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
या चित्रपटातून गोविंदा यांचा मुलगा यशवर्धन आहुजा हिंदी चित्रपटसृष्टीत मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण करणार आहे. त्याच्यासोबत नितांशी गोयल प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय सुनीता आहुजा, जेमी लीव्हर, चंकी पांडे, बृजेंद्र काला आणि सिमरत कौर रंधावा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्यामुळे नव्या कलाकारांसह अनुभवी कलाकारांची फळी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.