होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय खलाशांच्या टँकरवर हल्ला

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली
Hormuz
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या पनामाचा ध्वज असलेल्या ‘एमटी तारा गॅस’ या एलपीजी वाहतूक करणाऱ्या व्यापारी जहाजावर १६ नोव्हेंबर रोजी भीषण हल्ला झाला. या जहाजावर २४ भारतीय खलाशी होते. हल्ल्यानंतर झालेल्या बचावकार्यात २१ जणांना सुरक्षितपणे ओमानच्या किनाऱ्यावर आणण्यात आले असून, दोन खलाशी जखमी झाले आहेत. एक भारतीय खलाशी अद्याप बेपत्ता आहे. या घटनेचा भारताने तीव्र निषेध केला असून व्यापारी जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचे प्रकार तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे.



केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने १७ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केले. त्यानुसार, ‘एमटी तारा गॅस’वरील २४ भारतीय नागरिकांपैकी २१ जणांना ओमानमधील खासाब येथे सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात आले आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, एका भारतीयाचा शोध अद्याप सुरू आहे. ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शोध आणि बचाव मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या मोहिमेत वेळेवर सहकार्य केल्याबद्दल भारताने ओमान सरकारचे आभार मानले आहेत.

होर्मुझच्या सामुद्रधुनी परिसरात व्यापारी जहाजांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांबाबत भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अशा घटनांमुळे समुद्रात कार्यरत असलेल्या नागरी खलाशांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने नमूद केले. व्यापारी जहाजे तसेच नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचे हल्ले थांबवले पाहिजेत, अशी ठाम भूमिका भारताने मांडली आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करून जागतिक जलमार्गांवरील नौकानयन आणि व्यापाराची मुक्त, निर्बाध वाहतूक शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यात यावी, असेही भारताने स्पष्ट केले.

होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर हल्ले होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी २१ ऑक्टोबर रोजी कुवेतचा ध्वज असलेल्या ‘एम/टी अल दास्मा’ या तेलवाहू जहाजावरही या मार्गावरून प्रवास करताना हल्ला झाला होता. या जहाजावर २१ भारतीय खलाशांसह अन्य कर्मचारी होते. या घटनेतील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असल्याची माहिती केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली होती.

जागतिक तेल वाहतुकीच्या दृष्टीने होर्मुझची सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग मानला जातो. त्यामुळे या परिसरातील सुरक्षेचा प्रश्न केवळ जहाजांवरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेपुरता मर्यादित राहत नाही; तर आंतरराष्ट्रीय ऊर्जा पुरवठा आणि व्यापारी वाहतुकीवरही त्याचे परिणाम होण्याची शक्यता आहे.