राजस्थान
Jhunjhunu Panchayat Election राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले. खेतडी उपविभागातील विजय नगर ग्रामपंचायतीत मतदान संपण्यास अवघा एक तास शिल्लक असताना मतदान केंद्राजवळ दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी आणि दगडफेक झाली. या घटनेत गंभीर जखमी झालेले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच लक्ष्मीनारायण सैनी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मारहाण आणि तोडफोडीचे काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनारायण सैनी हे विजय नगर ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेत सक्रिय होते. या निवडणुकीत त्यांची सून सुमन या सरपंचपदाच्या उमेदवार आहेत. मतदान संपण्याच्या सुमारे एक तास आधी मतदान केंद्राजवळ निवडणुकीच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर काही वेळातच मारहाण आणि दगडफेकीत झाले. या संघर्षात पाच ते सात जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
याच दरम्यान, सैनी यांच्या डोक्याला दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी नीमकाथाना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मृतदेह नीमकाथाना रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक कारवाई करत तीन ते चार संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. संपूर्ण घटनेचा तपास सुरू असून, समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या व्हिडिओंच्या आधारे हिंसाचारात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचे कामही पोलिसांकडून केले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच राजस्थानचे माजी मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नीमकाथाना रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून सरकारवर टीका केली. राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळत असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असलेल्या निवडणुकीदरम्यान अशा प्रकारे हिंसाचार होणे ही गंभीर चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी म्हटले.
माजी सरपंचाच्या मृत्यूमुळे विजय नगर ग्रामपंचायत परिसरात तणाव निर्माण झाला आहे. परिस्थिती पुन्हा चिघळू नये यासाठी पोलिस आणि प्रशासन सतर्क असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.