दिवाळी हंगामात कारंजा आगाराच्या उत्पन्नात १७ लाखांची वाढ !

१४६०८ किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
कारंजा लाड,
karanja दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कारंजा आगाराने केलेल्या नियोजनाला यंदा चांगले यश मिळाले आहे. मागील वर्षीच्या दिवाळी हंगामाच्या तुलनेत यंदा कारंजा आगाराच्या बसगाड्यांनी तब्बल १४ हजार ६०८ किलोमीटर अधिक अंतर पार केले असून, आगाराच्या उत्पन्नात १७ लाख ६ हजार ७८४ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक हेमंत चांदूरकर यांनी दिली.
 
 
karanja
 
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक नागरिक, विद्यार्थी, नोकरदार तसेच चाकरमानी आपल्या मूळ गावी येतात. सण संपल्यानंतर पुन्हा कामाच्या ठिकाणी परतणार्‍या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या काळात खासगी प्रवासी वाहतुकीसोबतच एसटी बसलाही मोठी पसंती मिळते. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन कारंजा आगाराने बसफेर्‍यांचे नियोजन केले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी उपलब्ध बसगाड्यांचा अधिकाधिक वापर करून वाहतूक सेवा देण्यावर भर देण्यात आला. यंदाच्या दिवाळी हंगामात गतवर्षीच्या तुलनेत १४ हजार ६०८ किलोमीटर अधिक बस चालविण्यात आल्या. त्याचा थेट सकारात्मक परिणाम आगाराच्या उत्पन्नावर झाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल १७ लाख ६ हजार ७८४ रुपयांनी उत्पन्न वाढले आहे.
 
  
वाढलेले किलोमीटर आणि उत्पन्नाचे आकडे पाहता कारंजा आगाराच्या वाहतूक नियोजनाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीने दिवाळीसारखा गर्दीचा हंगाम महत्त्वाचा असतो. अशा काळात प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी वाहतूक सेवा उपलब्ध करून देतानाच उत्पन्नवाढ साधणे हे आगारासमोरील महत्त्वाचे आव्हान असते. कारंजा आगाराने यंदा अधिक किलोमीटर बस चालवून आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ नोंदवून समाधानकारक कामगिरी केली आहे. दिवाळी हंगामातील या कामगिरीमुळे कारंजा आगाराच्या अधिकारी, चालक, वाहक तसेच इतर कर्मचार्‍यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आगामी काळातही प्रवाशांना दर्जेदार सेवा देत आगाराच्या उत्पन्नात अशीच वाढ कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
 
एनसीएमसी कार्ड सक्ती शिथिलतेचा फायदा
सवलतीच्या दरात प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. परंतु काही प्रवाशांचे एनसीएमसी नोंदणी सह इतर बाबी पूर्ण झाल्या नसल्याने एनसीएमसी कार्ड सक्तीला काही वेळ शिथिलता देण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम एसटी प्रवाशांवर झाला परिणामी कारंजा आगाराला मागील दिवाळीच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळविता आले. यासाठी आगारातील सर्व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.
हेमंत चांदुरकर, आगार व्यवस्थापक