kartiki-ekadashiहिंदू धर्मात कार्तिकी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असून, या दिवशी भगवान श्रीविष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. शास्त्रात या पवित्र दिवशी केलेल्या दानधर्माला विशेष महत्त्व दिले असून, या दिवशी विशिष्ट रंगाच्या वस्तू दान केल्यास घरात लक्ष्मी अखंड टिकून राहते आणि कधीही कशाची कमतरता भासत नाही.
कार्तिकी एकादशीच्या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तींना गहू, डाळी, पीठ किंवा तयार सात्त्विक अन्नाचे दान करणे अत्यंत पुण्याचं मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, अन्नदान हे सर्व दानांमध्ये सर्वश्रेष्ठ असल्यानं या दिवशी भुकेल्याला अन्न दिल्यास घरात धन-धान्याची बरकत राहते.
कार्तिक महिन्यात आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो अशी श्रद्धा आहे, त्यामुळे या महिन्यात आवळा खाणे आणि दान करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. कार्तिकी एकादशीला आवळे दान केल्यास उत्तम आरोग्य लाभते आणि जीवनातील संकटं दूर होतात.
कार्तिक महिन्यात थंडीची सुरुवात होत असल्यानं गरीब आणि निराधार लोकांना ब्लँकेट, शाल किंवा उबदार कपडे दान केल्यास पितरांचा आशीर्वाद मिळतो. यासोबतच मंदिरात किंवा तुळशीजवळ दिवा लावण्यासाठी तूप, तेल, वात किंवा कास्याची भांडी दान केल्याने जीवनातील अंधकार नष्ट होतो.
हिंदू धर्मात गाईमध्ये सर्व देवी-देवतांचा वास मानला जातो, त्यामुळे कार्तिकी एकादशीच्या दिवशी गाईंना हिरवा चारा खाऊ घालणे किंवा गोशाळेत यथाशक्ती दान करणे अत्यंत उत्तम ठरते. यामुळे पूर्वापार चालत आलेल्या दोषांचे निवारण होऊन घरात सुख-शांती नांदते.