कुलगाम चकमकीत लष्करचा कमांडर लतीफ भट ठार

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
श्रीनगर
Kulgam Encounter
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करत दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद लतीफ भट याचा खात्मा केला. कुलगाम हल्ल्याचा सूत्रधार म्हणून त्याची ओळख होती. एका मशिदीत लपून बसलेल्या लतीफला सुरक्षा दलाने आत्मसमर्पण करण्याची संधी दिली होती. मात्र, त्याने शरण येण्यास स्पष्ट नकार दिला. ‘मला अल्लाहकडे जायचे आहे,’ असे सांगत त्याने शस्त्रे खाली ठेवण्यास नकार दिल्यानंतर सुरक्षा दलाने कारवाई केली. या चकमकीत तो मारला गेला.



कुलगामचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) अनायत अली यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे. लतीफला आत्मसमर्पणासाठी तयार करण्याच्या उद्देशाने अनायत अली यांनी त्याच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे बराच वेळ संवाद साधला होता. त्याला शस्त्रे खाली ठेवून पोलिसांसमोर शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. आत्मसमर्पण केल्यास त्याच्याविरोधात चकमकीची कारवाई केली जाणार नाही, असा विश्वासही त्याला देण्यात आला होता. मात्र, त्याने सुरक्षा दलाचे आवाहन फेटाळून लावले. ‘अल्लाहशिवाय माझे कोणीही नाही. मी अल्लाहकडे जात आहे,’ असे म्हणत त्याने शरणागती पत्करण्यास नकार दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री २ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास लतीफ मशिदीत दाखल झाला होता. त्यानंतर तेथे गोळीबाराची घटना घडली. त्याला सुरक्षितपणे बाहेर आणण्यासाठी सुरक्षा दलाने सुरुवातीला संवादाचा मार्ग स्वीकारला. मात्र, त्याचा प्रतिसाद न मिळाल्याने अखेर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. लतीफला मशिदीबाहेर येण्यास भाग पाडल्यानंतर तो बाहेर पडताच त्याच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या संपूर्ण मोहिमेदरम्यान धार्मिक स्थळाचे पावित्र्य आणि सुरक्षितता जपण्याची खबरदारी घेण्यात आली. सुरक्षा दलाने मशिदीत प्रवेश करून कोणतीही कारवाई केली नाही, तर तो स्वतःहून बाहेर येण्याची प्रतीक्षा करण्यात आली, अशी माहिती एसएसपी अनायत अली यांनी दिली.

लतीफ भट हा १८ नोव्हेंबर २०२५ रोजी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. त्याने कथितपणे स्वतःच्या इच्छेने कट्टरपंथाचा मार्ग स्वीकारल्याचे सांगितले जाते. त्यानंतर सीमापलीकडून त्याला जम्मू-काश्मीरमधील सामाजिक सलोखा, पर्यटन व्यवसाय आणि अर्थव्यवस्था यांना लक्ष्य करून त्यांचे नुकसान करण्याच्या सूचना मिळत असल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांकडून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते.

कुलगाम जिल्ह्यातील सीआरपीएफच्या नाक्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा लतीफ हा प्रमुख सूत्रधार असल्याचा तपास यंत्रणांना संशय होता. हल्ल्याच्या एक दिवस आधी त्याने आणि त्याचा साथीदार दहशतवादी उमर निसार डार याने जिल्ह्यातील अनेक संवेदनशील ठिकाणांची पाहणी केली होती. मीर बाजार, अखरान, हबलिश आणि किलम या परिसरांत जाऊन त्यांनी सुरक्षा दलाच्या हालचालींची माहिती घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. सुरक्षा दलाला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेली ही रेकी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्येही कैद झाली होती.

या पाहणीनंतर दुसऱ्याच दिवशी दोन्ही दहशतवाद्यांनी अखरान परिसरातील सीआरपीएफच्या नाक्यावर अचानक गोळीबार केला. हल्ल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. या घटनेचा तपास सुरू झाल्यानंतर त्यामागे मोहम्मद लतीफ भट याचा सहभाग असल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी आणि दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी सुरक्षा दलाने विशेष मोहीम हाती घेतली होती. अखेर कुलगाममधील चकमकीत त्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. या कारवाईमुळे कुलगाम हल्ल्याच्या तपासातील महत्त्वाचा दुवा समोर आला असून, दक्षिण काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहिमेला महत्त्वाचे यश मिळाल्याचे मानले जात आहे.