नागपूर,
mahajyoti-obc-controversyमहात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात 'महाज्योती'च्या कारभारावरून ओबीसी युवा अधिकार मंचाने आक्रमक भूमिका घेतली आहे. संस्थेच्या विद्यमान व्यवस्थापकीय संचालकांच्या अकार्यक्षम आणि विद्यार्थीविरोधी कारभारामुळे राज्यातील सुमारे एक लाख ओबीसी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप मंचाने केला आहे. त्यामुळे विद्यमान व्यवस्थापकीय संचालकांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांच्या जागी पूर्णवेळ सक्षम आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
मंचाच्या आरोपानुसार, १ ऑगस्ट २०२५ रोजी पदभार स्वीकारल्यापासून १७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत एकाही नवीन विद्यार्थ्याला योजनेचा लाभ मिळालेला नाही, तसेच नवीन प्रशिक्षण अभ्यासक्रमही सुरू करण्यात आलेला नाही. एमपीएससी गट-ब व गट-कसह यूपीएससीसारख्या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असतानाही प्रशिक्षण सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे नियोजन कोलमडले आहे. परीक्षा झाल्यानंतर प्रशिक्षण सुरू करून विद्यार्थ्यांना काय फायदा होणार, असा सवाल मंचाने उपस्थित केला आहे.
महाज्योतीकडे प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी सुमारे ४५० कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध असून, ३१ मार्चपूर्वी हा निधी खर्च न झाल्यास तो शासनाकडे परत जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेत जाणीवपूर्वक विलंब करून खासगी प्रशिक्षण संस्थांना फायदा पोहोचविण्याचा आणि निधीवाटपात भ्रष्टाचार होण्याचा संशयही मंचाने व्यक्त केला आहे.
बार्टी, सारथी, टीआरटीआय आणि अमृत या संस्थांप्रमाणे महाज्योतीलाही पूर्णवेळ आयएएस अधिकारी द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ओबीसी युवा अधिकार मंचाने केली आहे.