प्रशिक्षण योजनांसाठी संस्था प्रयत्नशील
नागपूर,
mahajyoti महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ही राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत संस्था असून, विविध प्रशिक्षण योजनांची अंमलबजावणी शासनाचे नियम, मार्गदर्शक तत्त्वे आणि निर्धारित प्रशासकीय प्रक्रियेनुसार केली जाते. संस्थेच्या कामकाजात पारदर्शकता राखण्यासोबतच विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.

‘महाज्योती’च्या निधीचा विनियोग आणि प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीबाबत अलीकडे उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर संस्थेची कार्यपद्धती आणि प्रशिक्षण कार्यक्रमांची सद्यस्थिती महत्त्वाची ठरते. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि कौशल्य विकासविषयक प्रशिक्षण योजना राबविताना आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असते. त्यानुसार संस्थेचे कामकाज सुरू असल्याची भूमिका व्यवस्थापनाने मांडली आहे. राज्यातील विविध सामाजिक प्रवर्गांतील विद्यार्थ्यांसाठी बार्टी, सारथी, टीआरटीआय, वनार्टी आणि अमृत या संस्था प्रशिक्षण कार्यक्रम राबवितात. या संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांसोबतच ‘महाज्योती’चे प्रशिक्षणही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे ओबीसी, एसबीसी आणि व्हीजेएनटी प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संस्थेची भूमिका स्पष्ट झाली आहे. ‘महाज्योती’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हा संस्थेच्या कामकाजाचा केंद्रबिंदू आहे. प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या निर्धारित नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जात असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. संस्थेच्या कामकाजासंदर्भात कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी वस्तुस्थितीची खातरजमा करणे आवश्यक असल्याची भूमिकाही व्यवस्थापनाने मांडली आहे.
आरोप निराधार, कामकाज पारदर्शक
‘महाज्योती’वर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार आणि वस्तुस्थितीला धरून नाहीत. संस्थेचे कामकाज शासनाच्या नियम व मार्गदर्शक तत्त्वांनुसार पारदर्शकपणे सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन विविध प्रशिक्षण योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. बार्टी, सारथी, टीआरटीआय, वनार्टी आणि अमृत या सर्व संस्थांच्या प्रशिक्षणासोबतच 'महाज्योती'चे प्रशिक्षणही सुरू करण्यात येणार आहे. वस्तुस्थितीची खातरजमा केल्याशिवाय अशा प्रकारचे आरोप करणे योग्य नाही.
मिलिंद नारिंगे
व्यवस्थापकीय संचालक
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर (महाज्योती)