वंदे भारतच्या प्रवाशांना आता पुरणपोळी, झुणका-भाकरीचा बेत!

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
मुंबई
Vande Bharat
लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात आरामदायी प्रवासासोबतच चांगले आणि ताजे जेवण मिळावे, अशी प्रवाशांची अपेक्षा असते. त्यासाठी भारतीय रेल्वेकडून विविध गाड्यांमध्ये भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. तिकीट आरक्षित करतानाच जेवणाचा पर्याय निवडण्याची सोय असल्याने २० ते ३० तासांच्या प्रवासातही प्रवाशांना गरमागरम खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. आतापर्यंत बहुतांश रेल्वेगाड्यांमध्ये वरण, भात, फुलके, पनीरची भाजी, सलाड, दही आणि गोड पदार्थ असा नेहमीचा मेन्यू दिला जात होता. काही ठिकाणी जेवणानंतर आईस्क्रीमही दिले जाते. मात्र, आता या पारंपरिक मेन्यूमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. मुंबई-बंगळुरू वंदे भारत शयनयान एक्स्प्रेसमधील प्रवाशांना आता अस्सल महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची मेजवानी मिळण्याची शक्यता आहे.



या नव्या नियोजनानुसार प्रवाशांच्या जेवणात पुरणपोळी, झुणका, भाकरी आणि झणझणीत वांग्याच्या भरीतासारख्या पारंपरिक मराठमोळ्या पदार्थांचा समावेश करण्याचा विचार सुरू आहे. भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ अर्थात आयआरसीटीसीकडून यासंदर्भात तयारी केली जात आहे. त्यामुळे मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या वंदे भारत शयनयान एक्स्प्रेसमधून प्रवास करताना प्रवाशांना रेल्वेच्या भोजनासोबत महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची चवही अनुभवता येऊ शकते.

महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यपरंपरेची ओळख देशभरातील प्रवाशांना करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात महाराष्ट्रीय घरांमध्ये आवर्जून तयार केली जाणारी पुरणपोळी या मेन्यूचे प्रमुख आकर्षण ठरू शकते. त्यासोबत झुणका-भाकरी आणि तिखटजाळ वांग्याचे भरीत यांसारख्या पदार्थांनाही स्थान देण्याचा प्रस्ताव आहे.

या खाद्यपदार्थांबाबत प्रवाशांच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी आयआरसीटीसीने चाचण्या घेतल्या. या प्रक्रियेत पुरणपोळीला सर्वाधिक पसंती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर रेल्वेच्या खानपानविषयक नियम आणि निकषांमध्ये बसणाऱ्या पदार्थांची निवड करून त्यांचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठविण्यात येणार आहे. रेल्वे मंडळाची अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतरच हे पदार्थ प्रवाशांना प्रत्यक्ष उपलब्ध करून दिले जातील.

सध्या रेल्वेच्या बहुतांश भोजन व्यवस्थेत पनीरची भाजी, मिक्स व्हेज आणि इतर नेहमीच्या पदार्थांचा समावेश असतो. मात्र, नव्या प्रस्तावामुळे या मेन्यूमध्ये प्रादेशिक खाद्यसंस्कृतीला स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई-बंगळुरू वंदे भारत शयनयान एक्स्प्रेसमधील हा प्रयोग यशस्वी झाल्यास रेल्वे प्रवासात स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनेही तो महत्त्वाचा ठरू शकतो. आता रेल्वे मंडळाच्या मंजुरीनंतर मराठमोळ्या पदार्थांची ही मेजवानी प्रवाशांना कधीपासून मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.