प्लॅस्टिक बंदी अन् पाणी बचतीसाठी नगर पंचायत सरसावली !

आठवडी बाजार व मेन मार्केटमध्ये जनजागृती मोहीम

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
मालेगाव,
plastic-ban-and-water-conservation शहराचे पर्यावरण स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासोबतच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मालेगाव नगर पंचायत प्रशासनाने जनजागृतीचा पुढाकार घेतला आहे. शहरात प्लॅस्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि नागरिकांमध्ये पाणी बचतीविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने नगर पंचायतीच्या वतीने आठवडी बाजार तसेच मेन मार्केट परिसरात विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
 
 
plastic-ban-and-water-conservation
 
या मोहिमेदरम्यान नगर पंचायतीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी व्यापारी, दुकानदार आणि बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधत एकदाच वापरल्या जाणार्‍या प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आवाहन केले. प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा संदेश देत नागरिकांनी घराबाहेर पडताना सोबत कापडी पिशवी ठेवण्याची सवय अंगीकारावी, असे आवाहन करण्यात आले.
 
 
 
प्लॅस्टिक कचर्‍यामुळे नाल्या तुंबणे, परिसरात अस्वच्छता निर्माण होणे, माती व पर्यावरणाचे प्रदूषण वाढणे यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे प्लॅस्टिकमुक्त शहर घडविण्यासाठी प्रशासनासोबतच व्यापारी आणि नागरिकांनीही जबाबदारीने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे यावेळी पटवून देण्यात आले. व्यावसायिकांनी ग्राहकांना प्लॅस्टिक पिशव्या देण्याऐवजी कापडी पिशव्यांच्या वापरासाठी प्रोत्साहित करावे, असेही सांगण्यात आले.
 
 
केवळ प्लॅस्टिक बंदीच नव्हे, तर पाण्याची वाढती गरज आणि भविष्यात उद्भवू शकणारी पाणीटंचाई लक्षात घेता जलसंवर्धनाचाही संदेश या मोहिमेतून देण्यात आला. नळ सुरू ठेवून पाण्याचा अपव्यय करू नये, आवश्यक तेवढेच पाणी वापरावे, गळती तातडीने दुरुस्त करावी आणि पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान समजून त्याची बचत करावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले. नगर पंचायतचे मुख्याधिकारी पंकज सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी कर निरीक्षक अ. अजिज अ. सत्तार, स्वच्छता निरीक्षक किशोर पंडित, पाणीपुरवठा अभियंता योगेश तायडे, सहाय्यक कर निरीक्षक अरुण समुन्द्रे, शहर समन्वयक मोहम्मद मारुफ, तसेच सै. इरफान, प्रमोद हरणे, कमलेश कोळी, अनंता घुगे, रिजवान भाई आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
 
प्लॅस्टिक कचरा हा पर्यावरणासाठी गंभीर धोका असून त्यामुळे शहराच्या स्वच्छतेवर विपरीत परिणाम होतो. प्लॅस्टिकमुळे मुया प्राण्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ’माझे मालेगाव, स्वच्छ मालेगाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक नागरिक आणि व्यापार्‍याने प्लॅस्टिक बंदी मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. कापडी पिशव्यांचा वापर ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर पाण्याचा जपून वापर करून जलसंवर्धनाला प्राधान्य दिल्यास आपले मालेगाव स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक शहर म्हणून नक्कीच नावारूपास येईल.
ओमप्रकाश खुरसडे, अध्यक्ष, नगर पंचायत