दोन सख्ख्या बहिणींचे देशभर ‘खंडणी साम्राज्य’ !

गरिबीतून कोट्यधीश होण्याची महत्त्वाकांक्षा; पत्रकारितेच्या नावाखाली ५५ महिलांचे नेटवर्क

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur-news दोन वेळच्या जेवणाची भ्रांत... घरात गरिबीचे चटके... आई-वडिलांची मोलमजुरी आणि डोळ्यांत कोट्यधीश होण्याचे स्वप्न! या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दोन सख्ख्या बहिणींनी मेहनतीचा मार्ग निवडण्याऐवजी पत्रकारितेच्या नावाखाली खंडणीचा धंदा सुरू केला. विरोधात बातमी छापण्याची धमकी देऊन सरपंच आणि ग्रामसेवकांकडून पैसे उकळण्याचा कथित गोरखधंदा पुढे एका मोठ्या जाळ्यात रूपांतरित झाला. सुरुवातीला दोघी बहिणी, त्यानंतर चार जणी आणि पुढे तब्बल ५५ हून अधिक महिलांची फळी! एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा कथित खंडणीचा व्यवसाय आठ राज्यांपर्यंत पोहोचला. आता हे जाळे देशभर विस्तारण्याची तयारी सुरू असतानाच नागपूर ग्रामीण पोलिसांनी या महाघोटाळ्याचा पर्दाफाश केला.
 
nagpur-news
 
मध्य प्रदेशातील राजगढ शहराजवळील नरसिंहगड परिसरातील छतरी गावात राहणाऱ्या मोनिका लालसिंग सूर्यवंशी (२८) आणि तिची बहीण नेहा लालसिंग सूर्यवंशी यांची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची होती. आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अशा परिस्थितीत मोनिकाची शिक्षण घेत असताना एका पत्रकार मैत्रिणीशी ओळख झाली. या ओळखीनेच तिच्यासमोर पैसे कमावण्याचा एक वेगळाच मार्ग उघडला.
 
एकदा पत्रकार मैत्रिणीसोबत दुचाकीवरून फिरायला गेलेली असताना मोनिकाने एका ग्रामपंचायतीच्या सरपंचाला विरोधात बातमी प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन पैसे घेतल्याचे सांगितले जाते. सहज मिळालेल्या या पैशांनी तिच्या मनात वेगळेच गणित सुरू झाले. मेहनत न करता केवळ धमकीच्या जोरावर पैसे मिळू शकतात, ही कल्पना तिच्या डोक्यात पक्की झाली. त्यानंतर तिने जिल्हाधिकारी कार्यालयातून सरपंचांची नावे आणि मोबाइल क्रमांक मिळवले. बहीण नेहाला सोबत घेऊन दोघींनी फोनवरून धमकावण्यास सुरुवात केली. महिन्याभरातच सुमारे ७० हजार रुपये जमा झाल्याने या कथित गैरव्यवसायाला वेग आला.
 
मोबाईल ठरला खंडणीचा ‘कारखाना’!
सुरुवातीच्या कमाईतून मोनिका आणि नेहाने आणखी दोन मोबाइल खरेदी केले. इतर जिल्ह्यांतील सरपंचांची माहिती मिळवली. दोघींना वाढता व्याप सांभाळणे कठीण जाऊ लागल्याने त्यांनी अक्षरा अरक (२१) आणि कोमल मोरे (२३) या दोन बेरोजगार तरुणींना सोबत घेतले. यानंतर चौघींकडून सरपंचांना फोन करण्याचे सत्र सुरू झाले. बातमी प्रसिद्ध करण्याची भीती दाखवायची त्यातून पैसे उकळायचे, असा कथित प्रकार सुरू झाला. काही महिन्यांतच कमाईचा आकडा लाखोंमध्ये पोहोचला. हातातला मोबाइल हळूहळू त्यांच्या कथित खंडणी व्यवसायाचे प्रमुख हत्यार बनला.
 
दोन बहिणींपासून ५५ महिलांपर्यंत नेटवर्क
पैशांचा ओघ वाढू लागल्यावर या व्यवसायाचा आवाकाही वाढत गेला. मोनिका आणि नेहाने सुमारे ५० मोबाइल खरेदी करून शहरात भाड्याने घर घेतले आणि तेथे कॉल सेंटरच्या धर्तीवर काम सुरू केले. महिलांची भरती करण्यात आली. पाहता पाहता ५५ हून अधिक महिलांचे नेटवर्क उभे राहिले. एका गावातील सरपंचाला केलेल्या फोनपासून सुरू झालेला हा प्रकार आधी जिल्ह्यापुरता, नंतर राज्याबाहेर पोहोचला. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश अशा आठ राज्यांतील सरपंच व ग्रामसेवकांचे मोबाइल क्रमांक मिळवून त्यांना लक्ष्य करण्यात आले.
देशभर जाळे पसरवण्याचा डाव
आठ राज्यांमध्ये आपला प्रभाव निर्माण झाल्याचा समज झाल्यानंतर या बहिणींची महत्त्वाकांक्षा आणखी वाढली. कॉल सेंटरचा विस्तार करून देशभरातील सरपंच आणि ग्रामसेवकांना लक्ष्य करण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती आहे. मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध भाषांचे ज्ञान असलेल्या तरुणींना महिन्याला १५ ते २० हजार रुपये वेतन देऊन कामावर ठेवले. मात्र, नागपूर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी मोनिका, नेहा आणि अन्य दोन महिलांना अटक केली.