सीमेपलीकडून ड्रोनद्वारे घातपाताची रसद

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
राजस्थान
Pakistan Drone
ड्रोनच्या माध्यमातून भारतीय हद्दीत शस्त्रे, अमली पदार्थ आणि स्फोटकांची तस्करी करणाऱ्या पाकिस्तानमधील २८ हँडलर्सना राजस्थान पोलिसांनी विविध प्रकरणांत आरोपी म्हणून नामनिर्देशित केले आहे. या सर्वांची सविस्तर माहिती आता केंद्रीय सुरक्षा यंत्रणांशी सामायिक केली जाणार आहे. सीमावर्ती भागात ड्रोनच्या साहाय्याने माल टाकण्यापुरताच हा प्रकार मर्यादित नसून, देशाच्या अंतर्गत भागात कार्यरत असलेल्या स्थानिक मदतनीसांचे जाळेही या प्रकरणात महत्त्वाचे असल्याचे तपासातून समोर येत आहे. पाकिस्तानमधून मिळणाऱ्या निर्देशांनुसार हे नेटवर्क देशाच्या सुरक्षेत अडथळे निर्माण करण्यास मदत करत असल्याचा संशय आहे.



तस्करीच्या या नेटवर्कवर कारवाई करण्यासाठी राजस्थान पोलिसांनी दुहेरी रणनीती आखली आहे. ड्रोनद्वारे तस्करीचा माल टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शेतजमिनी आणि अन्य ठिकाणांची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तस्करीत सहकार्य करणाऱ्या व्यक्तींच्या जमिनी सरकारी ताब्यात घेण्याच्या दृष्टीनेही पावले उचलली जात आहेत. सीमेलगतच्या गावांमध्ये सक्रिय असलेल्या स्थानिक मदतनीसांची माहिती गोळा करून त्यांच्या संपूर्ण जाळ्याची तपासणी केली जात आहे.

पोलिसांनी विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीनुसार २८ पाकिस्तानी हँडलर्सची नावे नोंदवली आहेत. खाजूवाला परिसरात चिता, बिल्ला जट्टा आणि अली यांची नावे आहेत. रावला येथे लाहोरचा शाह चाचा, उमर चाचा, गंजा, अहमदीन चाया, अली मरूफ ऊर्फ डोगर ऊर्फ लंबरदार आणि बक्सी यांचा समावेश आहे. समेजा कोठी परिसरात खानजी, वीरजी, हसन, अली आणि अहमद ऊर्फ चाचा यांची नावे नोंदवण्यात आली आहेत. श्रीकरणपूर येथे वीरजी, तर जैतसर येथे याकूब, चाचा, वीरू आणि शिंदा यांची नावे आहेत. रामसिंहपूर परिसरात अली, जग्गा, शाहजी, हार्टबेल, चीस यूकेस, जसकरन वाहला आणि पवन भाही यांचा समावेश आहे. हनुमानगड जंक्शनमध्ये अली जट, तर गोलूवाला येथे याकूब याचे नाव नोंदवण्यात आले आहे.

दरम्यान, राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेच्या जवळ अनूपगड-सूरतगड रेल्वेमार्गावर नुकताच स्फोट झाला होता. या घटनेत सिमेंटच्या दोन खांबांचे मोठे नुकसान झाले होते. रेल्वेमार्गाला लक्ष्य करण्यामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी नेटवर्कचा हात असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली होती. या कटाचे धागेदोरे दहशतवादी शहजाद भट्टीच्या नेटवर्कशी जोडलेले आहेत का, याचाही तपास सुरू आहे.

हा कमी तीव्रतेचा स्फोट होता. मात्र, त्याच्या परिणामस्वरूप रेल्वेमार्गावर सुमारे दोन फूट खोल खड्डा पडला होता. स्फोटाचा आवाज जवळपास २०० मीटर अंतरापर्यंत ऐकू गेला. सुदैवाने, स्फोट झाला त्यावेळी त्या मार्गावरून कोणतीही रेल्वे जात नव्हती. तरीही या घटनेमुळे सीमावर्ती भागातील सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. या प्रकरणाचा तपास राजस्थान दहशतवादविरोधी पथक (एटीएस), गुप्तचर विभाग, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) आणि लष्करी गुप्तचर विभागासह विविध यंत्रणा करत आहेत. ड्रोनद्वारे होणारी तस्करी आणि सीमापार कार्यरत असलेल्या नेटवर्कचा या घटनांशी काही संबंध आहे का, याचाही तपासाच्या अनुषंगाने शोध घेतला जात आहे.

A