भोयणीत अवैध हातभट्टी दारूवर पोलिसांचा छापा

६६ हजारांचा मुद्देमाल जप्त!

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
मानोरा,
police-raid-illegal-liquor-distillery-in-bhoyani तालुयातील अवैध दारू विक्री व हातभट्टी व्यवसायाला आळा घालण्यासाठी मानोरा पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून, भोयणी परिसरात केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत १६० लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि ५०० लिटर मोहसडवा पोलिसांच्या हाती लागला. पोलिस निरीक्षक नैना पोहेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
 
 
police-raid-illegal-liquor-distillery-in-bhoyani
 
मानोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री व इतर अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस पथक गस्त घालत असताना भोयणी परिसरात गुप्त बातमीदाराकडून हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी छापा टाकून झडती घेतली.भोयणी येथील मिराबाई वासुदेव आडे हिच्या राहत्या घरी तपासणी केली असता टाकीमध्ये ६० लिटर गावठी हातभट्टीची दारू, किंमत ६ हजार रुपये, तर घराबाहेरील अंगणात प्लास्टिक टाकीमध्ये ३०० लिटर मोहसडवा, किंमत ३० हजार रुपये, असा एकूण ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. परिसरातील हरिचंद्र लचिराम राठोड याच्या राहत्या घरी छापा टाकला असता १०० लिटर गावठी हातभट्टीची दारू, किंमत १० हजार रुपये, तसेच अंगणातील प्लास्टिक टाकीमध्ये २०० लिटर मोहसडवा, किंमत २० हजार रुपये, असा एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशा प्रकारे दोन्ही स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण ६६ हजार रुपयांचा अवैध दारू निर्मितीशी संबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय मानोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत पाच ठिकाणी, तर महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली.
 
 
गावागावांत सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारूच्या व्यवसायामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक व सामाजिक संकट ओढवत असून, अशा अप्रमाणित दारूमुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कारवाईचे महिला व नागरिकांकडून स्वागत होत आहे. परिसरात कुठेही अवैध दारूविक्री, हातभट्टी निर्मिती अथवा इतर अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे (पाटील), अपर पोलिस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नैना पोहेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात पोहेकॉ राधेश्याम महल्ले, गजानन चव्हाण, फिरोज भुरीवाले, पोकॉ आशिष एकाडे, वैभव वानखडे व मपोकॉ सुषमा लोखंडे यांचा समावेश होता. पुढील तपास पोहेकॉ राधेश्याम महल्ले करीत आहेत.