पुणे,
pune-timber-market-fireपुण्यातील सर्वात मोठ्या प्लायवूड मार्केटला मध्यरात्री भीषण आग. भवानी पेठे भागात असणाऱ्या टिंबर मार्केट परिसरातील लाकूड आणि प्लायवूडच्या दुकानांना मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागून मोठे नुकसान झाले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने ५० ते ६० दुकानांना झळ पोहोचली, तर लगतच्या वसाहतीतील घरांचेही नुकसान झाले. आगीचे लोळ आणि धुराचे लोट पसरल्याने रहिवाशांमध्ये एकच घबराट उडाली. लहान मुलांसह नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. पुणे अग्निशमन दलाच्या २७ बंबांसह सुमारे १५० जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पुणे अग्निशमन दलाच्या २७ बंबांसह सुमारे १५० जवानांनी अथक प्रयत्न करून दोन तासांत आग आटोक्यात आणली.
टिंबर मार्केट परिसरात फर्निचर साहित्य आणि प्लायवूड विक्रीची मोठ्या प्रमाणावर दुकाने आहेत. विजय वल्लभ शाळेजवळ असलेला हा परिसर दाटीवाटीचा असून, अरुंद गल्ल्यांमध्ये लाकूड, फर्निचर आणि प्लायवूड साहित्याची दुकाने आहेत. बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास येथील एका दुकानात अचानक आग लागली. दुकानातील लाकूड आणि प्लायवूड साहित्याने पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला. काही वेळातच आगीने शेजारील दुकानांनाही विळखा घातला. ज्वलनशील साहित्यामुळे आग वेगाने पसरत गेली. त्यामुळे ५० ते ६० दुकानांना आगीची झळ पोहोचली.
आगीची माहिती मिळताच भवानी पेठेतील मुख्य अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. टिंबर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर लाकूड आणि प्लायवूड साहित्याची दुकाने असल्याने आगीची तीव्रता लक्षात घेऊन तातडीने अतिरिक्त अग्निशमन यंत्रणा पाचारण करण्यात आली. पुणे अग्निशमन दलाचे २४, पुणे कटक मंडळाचा एक आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे दोन, असे एकूण २७ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी गणेश सोनुने, उपमुख्य अधिकारी विजय भिलारे, पंकज जगताप, राजेश जगताप, प्रमोद सोनवणे, कमलेश चौधरी, कैलास शिंदे आणि नीलेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १५० जवानांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. चारही बाजूंनी पाण्याचा मारा करण्यात आला. दरम्यान, आगीची झळ लगतच्या वसाहतीतील घरांनाही पोहोचल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये कोणी अडकले आहे का, याची खातरजमा करण्यात आली. अखेर दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी गणेश सोनुने आणि उपमुख्य अधिकारी विजय भिलारे यांनी दिली. आग विझविण्याच्या कामात पोलिस, रुग्णवाहिका सेवा, महावितरण, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.
महापौर नागपूरे यांची घटनास्थळी भेट
आगीची माहिती मिळताच महापौर मंजुषा नागपूरे, नगरसेवक अजय खेडेकर, गणेश कल्याणकर आणि महापालिकेचे सहायक आयुक्त गुरम यांनी घटनास्थळी भेट दिली. महापौर नागपूरे यांनी परिसरातील रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आग आटोक्यात आल्यानंतरही अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तैनात होते. तसेच परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला.