मुंबई
Renowned Marathi Poet Dr Sharayu Krishna Asolkar ज्येष्ठ कवयित्री आणि प्राध्यापिका प्रा. डॉ. शरयू कृष्णा आसोलकर यांच्या अपघाती निधनाने साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात नांदगाव ओटव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ त्यांच्या चारचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत शरयू आसोलकर यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे बंधू वैभव आसोलकर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शरयू आसोलकर आणि त्यांचे बंधू वैभव आसोलकर हे चारचाकीने रत्नागिरीहून सावंतवाडीकडे जात होते. त्यांची कार नांदगाव ओटव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ आली असता अचानक एक गाय कारसमोर आडवी आली. गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने कार वळवली. मात्र, या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव चारचाकी महामार्गाच्या मधल्या दुभाजकावर जोरात आदळली.
धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात कारमधील दोघांनाही गंभीर दुखापत झाली. जखमी शरयू आसोलकर यांना तातडीने उपचारासाठी कणकवली येथे हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच आसोलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.दरम्यान, वैभव आसोलकर यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.