मुंबई
Rimi Tomy संगीतविश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पार्श्वगायिका आणि टेलिव्हिजनवरील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व रिमी टॉमी हिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. मुंबईस्थित मल्याळी बॉडीबिल्डर आणि फिटनेस ट्रेनर लिबिन मॅथ्यू याच्यासोबत ती विवाहबंधनात अडकली. १४ नोव्हेंबर रोजी मुंबईतील डोंबिवली येथे हा विवाहसोहळा पार पडला. या खासगी समारंभाला दोन्ही कुटुंबांतील जवळचे सदस्य आणि नातेवाईक उपस्थित होते. दरम्यान, रिमीच्या लग्नातील छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

रिमी टॉमी हिने यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनेलवरील एका व्हिडीओच्या माध्यमातून लग्नाची घोषणा केली होती. या व्हिडीओमध्ये तिने लिबिनसोबतच्या नात्याबद्दल तसेच लग्नाच्या तयारीविषयी माहिती दिली होती. लग्नासाठी मुंबईची निवड का केली, याबद्दलही तिने सांगितले होते. “मी महिन्यातून एक किंवा दोनदा मुंबईला जात असते. मात्र, यावेळी मुंबईला जाणं खास आहे. मी माझ्या लग्नासाठी मुंबईला जात आहे. लिबिनचा जन्म आणि बालपण मुंबईतील डोंबिवलीत गेलं आहे. त्यामुळे आम्ही लग्नही तिथेच करण्याचा निर्णय घेतला,” असे रिमीने सांगितले होते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता.
लिबिनच्या पार्श्वभूमीबद्दल बोलताना रिमीने सांगितले की, लिबिन मल्याळी असला तरी त्याचे बालपण मुंबईत गेले आहे. तिची ओळख झाल्यानंतर त्याने मल्याळम भाषा बोलण्यास सुरुवात केली, असेही तिने नमूद केले. रिमी आणि लिबिन यांचा विवाहसोहळा अत्यंत साध्या आणि खासगी स्वरूपात पार पडला. यावेळी रिमीची आई, भावंडे आणि कुटुंबातील काही मोजके सदस्य उपस्थित होते.
रिमी टॉमीचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी तिचा विवाह व्यावसायिक रॉयस किझाकूडन याच्याशी झाला होता. २७ एप्रिल २००८ रोजी दोघे विवाहबंधनात अडकले होते. त्यावेळी रिमीचे वय २४ वर्षे होते. मात्र, लग्नाच्या ११ वर्षांनंतर या दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. त्यानंतर आता रिमीने आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे.
रिमी टॉमीने २००२ मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. मल्याळम चित्रपटातून तिने पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केले. गायनासोबतच टेलिव्हिजनवरील कार्यक्रमांमधूनही तिने प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवली आहे.