रोहितची क्रमवारीत घसरण!

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
दुबई,
rohit-slips-in-the-rankings आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंच्या स्थानांमध्ये बदल पाहायला मिळाले आहेत. भारतीय कर्णधार शुभमन गिलने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत अपेक्षित कामगिरी करता न आल्याने रोहित शर्माला एका स्थानाचा फटका बसला आहे. दुसरीकडे, विराट कोहलीने तिसरे स्थान टिकवून ठेवले आहे.

rohit-slips-in-the-rankings  
 
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर आयसीसीने नवी क्रमवारी प्रसिद्ध केली. शुभमन गिलला मालिकेतील अखेरचे दोन सामने खेळता आले नव्हते. तरीही ८०६ रेटिंग गुणांसह त्याने अव्वल स्थानावरील पकड कायम ठेवली आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल ७७८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारताचा विराट कोहली ७५७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे.
 
अफगाणिस्तानच्या इब्राहिम झद्रानने क्रमवारीत एका स्थानाची सुधारणा करत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याचे सध्याचे रेटिंग ७५२ आहे. याउलट रोहित शर्माला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याला दोन वेळा भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे त्याचे रेटिंग ७३२ पर्यंत खाली आले आहे.
 
वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप याने एका स्थानाची प्रगती करत सहावे स्थान मिळवले आहे. इंग्लंडचा बेन डकेट एका स्थानाने घसरून ६९९ गुणांसह सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा बाबर आझम आणि इंग्लंडचा जो रूट यांनीही क्रमवारीत सुधारणा केली आहे. श्रीलंकेच्या कुसल मेंडिसने दोन स्थानांची झेप घेत पहिल्या दहामध्ये प्रवेश केला असून तो दहाव्या क्रमांकावर आहे.
 
दरम्यान, इंग्लंडच्या टॉम बँटनने क्रमवारीत सर्वाधिक प्रगती करणाऱ्या फलंदाजांमध्ये लक्ष वेधले आहे. त्याने तब्बल ३४ स्थानांची झेप घेत १३ वे स्थान मिळवले आहे. त्याचे रेटिंग ६२८ झाले आहे. आगामी एकदिवसीय सामन्यांमधील खेळाडूंच्या कामगिरीनुसार या क्रमवारीत पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.