रशियन लष्करी विमानाचा भीषण अपघात; १९ जणांचा मृत्यू

    दिनांक :18-Nov-2026
Total Views |
रशिया,
russia-military-plane-crash-19-deadरशियामधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंगळवारी पश्चिमी सायबेरियातील केमेरोवो प्रांतात रशियन लष्कराचे एक मोठे वाहतूक विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या भीषण अपघातात विमानातील चालक दलाच्या सदस्यांसह सर्व १९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या दुर्घटनेची अधिकृत पुष्टी केली असून, या घटनेमुळे रशियन लष्करी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
 

rashoyan plane crash 
 
मॉस्कोपासून ३,००० किमी दूर निर्जन भागात कोसळले विमान
रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त झालेले विमान हे 'An-12' प्रकारातील लष्करी वाहतूक विमान होते. मंगळवारी केमेरोवो प्रांतातील यागुनोवो गावाजवळ एका निर्जन परिसरात हे विमान कोसळले. हे ठिकाण रशियाची राजधानी मॉस्कोपासून सुमारे ३,००० किलोमीटर पूर्वेला आहे. सुदैवाने विमान लोकवस्ती नसलेल्या निर्जन भागात कोसळल्यामुळे जमिनीवरील कोणत्याही नागरिकाची जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. मात्र, विमानातील सर्व १९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
 
या भीषण विमान अपघातामागे विमानाच्या उपकरणांमधील तांत्रिक बिघाड हे संभाव्य कारण असू शकते, असा प्राथमिक अंदाज संरक्षण मंत्रालयाने वर्तवला आहे. मात्र, अद्याप याला अंतिम कारण मानलं गेलेलं नाही. अपघाताची नेमकी कारणं शोधण्यासाठी हवाई दलाच्या तज्ज्ञांची एक विशेष समिती नेमण्यात आली आहे. उड्डाणादरम्यान विमानात नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला आणि चालक दलाला त्यावर नियंत्रण का मिळवता आले नाही, याचा सखोल तपास अधिकारी करत आहेत.