senior-citizens-mobile-addictionलहान मुलांनंतर आता ज्येष्ठ नागरिकांमध्येही मोबाईलचे व्यसन वेगाने वाढत असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रिकाम्या वेळेत सतत मोबाईलवर रील्स आणि व्हिडिओ पाहण्याची सवय ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. या गंभीर समस्येबाबत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मिराज कादरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
पूर्वी मोबाईलच्या व्यसनाबाबत केवळ लहान मुले आणि तरुणांचीच चर्चा होत होती. मात्र, आता ज्येष्ठ नागरिकांमध्येही मोबाईलच्या अतिवापराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. कोणतेही काम नसताना किंवा रिकामा वेळ असताना मोबाईल वापरण्याची त्यांची सवय वाढली आहे. मोबाईलवर सतत रील्स आणि व्हिडिओ पाहण्यात त्यांचा बराच वेळ जात असून, या सवयीमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावरही विपरीत परिणाम होत आहे.
मोबाईलच्या अतिवापरामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या झोपेवर गंभीर परिणाम होत आहेत. झोपेचे प्रमाण कमी होणे आणि स्वभावात चिडचिड वाढणे यांसारख्या समस्या त्यांच्यामध्ये दिसून येत आहेत. मोबाईलवरील सततच्या स्क्रीन टाइममुळे मेंदूला जास्त उत्तेजना मिळते. याचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊन नैराश्य आणि चिंता यांसारखी लक्षणे बळावू शकतात.