अनिल कांबळे
नागपूर,
share-trading-fraudशेअर ट्रेडिंगमध्ये अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी एका शिक्षिकेला तब्बल ७४ लाख ३६ हजार रुपयांनी गंडा घातला. दोन महिला सायबर आरोपींसह अन्य व्यक्तींनी संगनमताने शिक्षिकेची आयुष्यभराची जमापुंजी लुटली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विविध बँक खात्यांच्या आधारे पोलिस तपास करीत असून आरोपींचा ठोस मागमूस अद्याप लागलेला नाही.
नंदनवन ले-आउट येथे राहणाऱ्या पुष्पा (वय ५४) या शिक्षिका आहेत. त्यांना गुंतवणूक करायची असल्याने त्या सोशल मीडियावर विविध पर्याय शोधत होत्या. याचदरम्यान त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल, अशी जाहिरात दिसली. संबंधित संकेतस्थळावर माहिती शोधल्यानंतर मीरा कपूर आणि इशिता सिंह नावाच्या महिलांनी त्यांच्याशी संपर्क साधला.
आरोपी महिलांनी कमी कालावधीत मोठा परतावा मिळण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर शिक्षिकेला गुंतवणुकीशी संबंधित सोशल मीडिया ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. या ग्रुपमधील विविध सदस्य वेगवेगळ्या नावांनी आणि मोबाइल क्रमांकांवरून गुंतवणुकीत मोठा नफा झाल्याचे सांगत होते. त्यांच्या संदेशांमुळे शिक्षिकेचा विश्वास बसला आणि त्यांनी पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. फसवणूक करणाऱ्यांनी शिक्षिकेच्या नावाने बनावट खाते तयार केले. तसेच विश्वास संपादन करण्यासाठी बनावट करारपत्रही तयार केले. त्यानंतर आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये शिक्षिकेने एकूण ७४ लाख ३६ हजार रुपये जमा केले. गुंतवणुकीवर मोठा नफा मिळाल्याचे दाखवले जात होते; मात्र प्रत्यक्ष पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना रक्कम मिळत नव्हती. याबाबत विचारणा केली असता आरोपी आणखी पैसे गुंतविण्यासाठी दबाव टाकत होते.
त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा संशय शिक्षिकेला आला. त्यांनी संबंधित बँक आणि सायबर पोलिसांकडे तक्रार केली. प्राथमिक तपासात फसवणुकीची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींनी वापरलेल्या बँक खात्यांच्या आधारे तपास सुरू असून, या रकमेचा पुढील व्यवहार आणि आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत